नगर शहरातील गोळीबार प्रकरणाला नाट्यमय वळण ; गुन्ह्यातील फिर्यादीच निघाला मुख्य मास्टरमाईंड..!

गुन्ह्यातील फिर्यादीच निघाला मुख्य मास्टरमाईंड..!
सुपारी देऊन स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा; गोळीबार प्रकरणात गावठी पिस्तुलासह आरोपी जेरबंद
पाईपलाईन रोडवरील गोळीबार प्रकरणाला नाट्यमय वळण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील तुळजाभवानी मंदिराजवळील पुणेरी अमृततुल्य चहाच्या दुकानासमोरील गोळीबार आणि हल्ला प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून, या गुन्ह्यातील फिर्यादीच संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. स्वतःवर हल्ला घडवून आणण्यासाठी सुपारी देत बनावट गुन्हा रचल्याचा धक्कादायक खुलासा तोफखाना पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे.
दि. 24 मे 2026 रोजी चिरंजीव दत्तात्रय गाढवे (वय 31, रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा, ता. जि. अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी नमूद केले होते की, ते त्यांचा मित्र राजु काळे यांच्यासह पाईपलाईन रोडवरील पुणेरी अमृततुल्य येथे चहा पिण्यासाठी गेले असताना अचानक काही अनोळखी इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला.
फिर्यादी चिरंजीव गाढवे हे काऊंटरवर पाण्याची बाटली घेत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या तीन ते चार इसमांपैकी एकाने धारदार शस्त्राने त्यांच्या पाठीवर वार केला. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत ते चहाच्या दुकानात पळाले. त्यानंतर आरोपी दुकानात घुसून “आमच्या पप्पू शेठच, गौरव भाऊच नाव गुन्ह्यात घेतो का?” असे म्हणत त्यांच्या हातातील धारदार व टणक वस्तूने तसेच लाथाबुयांनी मारहाण केली. घटनास्थळावरून जाताना आरोपींपैकी एकाने कमरेतील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला आणि सर्व आरोपी मॉपेडवरून पसार झाले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.रजि. नं. 401/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118 (1), 125, 3 (5) तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जगदिश भांबळ यांच्याकडे सोपविण्यात आला.
तपासादरम्यान पोलीस निरीक्षक जगदिश भांबळ यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार केले. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काळ्या रंगाच्या मॉपेडवर चार युवक तोंडाला मास्क लावून घटनास्थळावर येताना व तेथून पसार होताना दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्यात सहभागाची कबुली दिल्यानंतर त्यांना बाल न्याय मंडळ, अहिल्यानगर येथे हजर करण्यात आले.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ऋतिक आनंद हरिहर हा त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी पथकासह सावता नगर, पम्पिंग स्टेशन, भिंगार परिसरात वेषांतर करून सापळा रचला. यावेळी आरोपी ऋतिक आनंद हरिहर (वय 19, रा. सावता नगर, पम्पिंग स्टेशन, भिंगार, ता. जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा करत सदरचा गुन्हा हा फिर्यादी चिरंजीव दत्तात्रय गाढवे यानेच सुपारी देऊन करण्यास सांगितल्याची कबुली दिली.
स्वतःवर हल्ला घडवून आणून विशिष्ट व्यक्तींना गुन्ह्यात अडकविण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. आरोपी ऋतिक आनंद हरिहर याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले अंदाजे 40 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल (कट्टा) जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदिश भांबळ करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक जगदिश भांबळ, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितिन उगलमुगले, अरुण गांगुर्डे, भानुदास खेडकर, अब्दुलकादर इनामदार, सुधीर खाडे, सुरज वाबळे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन, सुजय हिवाळे, सतिष शिंदे, बाळासाहेब भापसे, कपिल गायकवाड, भागवत बांगर, शाकीर सय्यद, महिला पोलीस नाईक जिजा खुडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्पना अवसरे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू, नितिन शिंदे आणि अरुण सांगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles