सेनापती बापट पतसंस्था घोटाळा: माजी आमदार विजय औटींना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस, राजकीय खळबळ

पारनेर, : सेनापती बापट मल्टिस्टेट पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार आणि ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आता आपला मोर्चा थेट पतसंस्थेचे संस्थापक आणि तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार विजय औटी यांच्याकडे वळवला आहे. या प्रकरणात मोठी कारवाई करत आर्थिक गुन्हे शाखेने विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, पतसंस्थेचे आजी-माजी संचालक आणि तब्बल 26 बड्या थकबाकीदार कर्जदारांना नोटीस बजावली आहे. या सर्वांना 29 व 30 मे रोजी आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांनी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून, आजी-माजी संचालकांचे धाबे दणाणले आहेत.

ठेवीदारांचे पैसे अडकल्याने वाद
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सेनापती बापट पतसंस्थेमध्ये ठेवीदारांचे पैसे अडकल्याने मोठे वाद निर्माण झाले आहेत. हक्काचे पैसे परत मिळत नसल्याने संतप्त ठेवीदारांनी कायदेशीर लढा सुरू केला होता. पतसंस्थेच्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालकांसह संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फॉरेन्सिक ऑडिटला गती
या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि गैरव्यवहाराची निश्चिती करण्यासाठी शासनाच्या वतीने फॉरेन्सिक ऑडिट मंजूर करण्यात आले आहे. या ऑडिटच्या माध्यमातून नेमकी कोणाची आणि किती जबाबदारी आहे, हे निश्चित केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, सन 2021-22 पर्यंत अस्तित्वात असलेल्या तत्कालीन संचालक मंडळाला आणि संशयास्पद रितीने मोठी कर्जे उचलणाऱ्या 26 बड्या थकबाकीदारांना चौकशीच्या फेऱ्यात ओढण्यात आले आहे.

या कारवाईचा भाग म्हणून शासनाच्या आदेशानुसार फॉरेन्सिक ऑडिट प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दिवसभर सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात ठाण मांडले होते. अधिकाऱ्यांनी दिवसभर पतसंस्थेतील महत्त्वाचे दस्तऐवज, नियमबाह्य आणि संशयास्पद वाटणाऱ्या कर्ज प्रकरणांच्या फाईल्स, तसेच संचालक मंडळाने घेतलेल्या विविध ठरावांच्या नकलांची कसून तपासणी केली.

14 जणांवर आधीच गुन्हा
यापूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेने शिक्रापूर येथील एका बड्या थकबाकीदार कर्जदाराला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याने पोलिसांचा तपास अत्यंत गंभीर दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्यांत कार्यक्षेत्र असलेल्या सेनापती बापट मल्टिस्टेट पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी जून 2025 मध्ये पतसंस्थेचे अध्यक्ष आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्यासह एकूण 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अळकुटी येथील सुभाष अश्रुजी आग्रे यांच्यासह 29 ठेवीदारांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कायदेशीर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये चेअरमन रामदास हुनमंत भोसले, अण्णासाहेब भाऊसाहेब औटी, ॲड. पंडितराव सखाराम कोल्हे, संभाजीराव सोमवंशी, विलास दशरथ बालवडकर, बाळासाहेब शामराव धोत्रे, बाबाजी किसन तनपुरे, रमेश बापू वाजे, संतोष गंगाधर चाहेर, अरुणा बाळासाहेब लाळगे, भास्कर विठोबा जाधव, दत्तात्रय कोंडीभाऊ कुलट, रामदास आनंदराव झंझाड आणि किरण शिंदे यांचा समावेश आहे. सध्या यातील दत्तात्रय कुलट आणि संभाजीराव सोमवंशी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, इतर 3 संचालक अद्याप फरार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles