सासू-सासर्‍यांच्या जाच ; पाथर्डी तालुक्यातील युवकाची आत्महत्या

पाथर्डी -तालुक्यातील खरवंडी कासार येथील प्रदीप धोंडीराम केळगंद्रे (वय अंदाजे 35) या युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी त्याच्या सासू-सासर्‍यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत मुलाचे वडील धोंडीराम तानाजी केळगंद्रे (वय 68, रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रदीपचा विवाह 7 फेब्रुवारी 2022 रोजी मिरजगाव येथील योगिता युवराज इंगळे हिच्याशी झाला होता. विवाहानंतर सासरे युवराज विष्णू इंगळे व सासू मालन युवराज इंगळे हे वारंवार घरी येऊन धमक्या देणे, पैसे मागणे, बदनामीची धमकी देणे तसेच फोनद्वारे मानसिक त्रास देत असल्याचे प्रदीपने अनेकदा वडिलांना सांगितले होते.

फिर्यादीनुसार, या त्रासामुळे प्रदीप नैराश्यात गेला होता. 24 मे रोजी त्याने गरोदर असलेल्या पत्नीला उपचारासाठी माहेरी सोडले होते. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून पत्नीला परत नांदविण्यास पाठवणार नसल्याची तसेच मिरजगावला आल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 30 मे रोजी सकाळी प्रदीपने आपल्या वडिलांना भेटून पत्नी आणि मुलाशी फोनवर बोलू दिले जात नसल्याचे सांगितले होते. त्याच दिवशी रात्री त्याने विषारी औषध प्राशन केल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 31 मे रोजी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी प्रदीपने एका कागदावर सासू-सासर्‍यांची नावे व मोबाईल क्रमांक लिहून मी या दोन व्यक्तींमुळे मरत आहे असा मजकूर लिहिल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles