प्रेमसंबंधांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी ; नगर तालुक्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर-प्रेमसंबंधातील कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 20 हजार रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निंबळक (ता. अहिल्यानगर) येथील 27 वर्षीय तरूणाने शनिवारी (30 मे) रात्री फिर्याद दिली आहे.

विकास शिंदे ऊर्फ शनीबाबा व बल्या (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार शुक्रवारी (29 मे) दुपारी दोनच्या सुमारास एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये घडला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एमआयडीसीतील एका कंपनीत असलेल्या महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने फोन केला. यावर फिर्यादीने त्या नंबरवर 2:14 वाजताच्या सुमारास फोन केला असता संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव बल्या असे सांगितले. त्याने फिर्यादी व महिलेच्या कथित प्रेमसंबंध दर्शविणारे फोटो आपल्या मोबाईलमध्ये असल्याचे सांगून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

दरम्यान, हे फोटो व्हायरल करायचे नसतील तर 20 हजार रूपये द्यावे लागतील, अन्यथा फोटो व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी (30 मे) सकाळी साडेअकराच्या सुमारास विकास शिंदे उर्फ शनीबाबा आणि बल्या यांनी पुन्हा फोन करून पोलिसांकडे तक्रार केल्यास खून करून टाकू, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार चौधरी करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles