अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेवर आता निवडणुकीपूर्वी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती

अहिल्यानगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार पाहण्यासाठी आता बँकेवर प्रशासकाऐवजी प्राधिकृत अधिकारी मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी बँकेवर प्रशासक (प्राधिकृत अधिकारी) नियुक्त करण्यात आला होता. परंतु आता विभागीय सहनिबंधक संभाजी निकम (नाशिक) यांनी त्यामध्ये बदल करत बँकेवर प्राधिकृत अधिकारी मंडळ (प्रशासकीय मंडळ) नियुक्त केले आहे.

तीन सदस्यीय प्रशासकीय मंडळाने पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. विभागीय सहनिबंधकांनी यासंदर्भातील आदेशात कोणतेही स्पष्टीकरण न देता हा बदल केला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत गेल्या फेब्रुवारी २०२६ मध्ये संपुष्टात आली. संचालक मंडळाची निवडणूक जाहीर होण्याची प्रतीक्षा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुरुवातीला राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रतीक्षा होती.

आता विधान परिषदेच्या अहिल्यानगर मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली असली तरी निवडणुकीची आचारसंहिता २२ जूनपर्यंत आहे. संचालक मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आल्याने विभागीय सहनिबंधक निकम यांनी बँकेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून महिन्यापूर्वी नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार निकाळजे यांनी त्याच दिवशी तातडीने पदाची सूत्रे स्वीकारली होती.

त्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी या आदेशामध्ये बदल करत प्राधिकृत अधिकाऱ्याऐवजी बँकेच्या कारभारावर तीन सदस्य प्रशासकीय मंडळामार्फत नियंत्रण ठेवले जाईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे. प्रशासकीय मंडळात विभागीय सहनिबंधक निकम अध्यक्ष असतील तर सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे व जिल्हा विशेष लेखापरीक्षक निकाळजे हे दोघे अन्य सदस्य असतील. या तिघांनीही पदभार स्वीकारला आहे. विभागीय सहनिबंधकांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करत हा बदल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles