राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पक्षाच्या सर्व खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच शिर्डीचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे सकाळपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याचे समोर आलेय. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे.उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी साडेबारा वाजता सर्व खासदारांना बैठकीसाठी बोलवले आहे. ऑपरेशन टायगरची राज्यात चर्चा सुरू असताना ठाकरेंकडून या बैठकीसाठी सर्वच खासदारांना उपस्थित राहण्याचे कडक आदेश देण्यात आले होते. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचे खासदार, मंत्री आणि आमदार यांनी पुन्हा ऑपरेशन टायगरला हवा दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी या दाव्यांमध्ये काही तथ्य नसल्याचा दावा करत उद्धव सेना ऑपरेशन लांडगा राबवले असे प्रत्युत्तर दिले आहे. ७ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत डेरेदाखल होते. त्यावेळी उद्धव सेनेचे काही खासदार त्यांच्या संपर्कात होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ऑपरेशन टायगर लवकरच पुर्णत्वास जाईल असा दावा केला आहे. दुसरीकडे आमदार निलेश राणे यांनी तर आमच्याकडे सातत्याने इनकमिंग सुरू आहे, मातोश्रीवरील आजच्या बैठकीला कोण उपस्थित राहतं ते पाहा असा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे या बैठकीवर ऑपरेशन टायगरचे सावट उभं ठाकलं आहे.


