नगरमध्ये मोहरम मिरवणुकांमध्ये डीजेला बंदी; नियम मोडल्यास कारवाई, पोलिसांच्या स्पष्ट सूचना

मोहरम मिरवणुकांमध्ये डीजेला बंदी; नियम मोडल्यास कारवाई, पोलिसांच्या स्पष्ट सूचना

अहिल्यानगर, 15 जून 2026: 17 जूनपासून सुरू होणाऱ्या मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर शहर पोलिसांनी तयारीला वेग दिला आहे. मोहरम मिरवणुकांमध्ये डीजे वाजविण्यास सक्त मनाई करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून डीजे जप्त करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिला.

शांतता समितीची बैठक
मोहरम उत्सवाच्या अनुषंगाने छोटे बारा इमाम कोठला परिसरात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, भिंगार कॅम्पच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, गोपनीय शाखेचे कर्मचारी, विविध यंग पार्टीचे पदाधिकारी, सरबत गाडी चालक, ठेंभा व सवारी मिरवणूक मंडळांचे प्रमुख तसेच जबाबदार नागरिक उपस्थित होते.

बैठकीदरम्यान मोहरम उत्सव आयोजकांनी मिरवणूक मार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे, पुरेशी वीज व्यवस्था उपलब्ध करून देणे, महिला बंदोबस्त वाढविणे तसेच सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडिओवर लक्ष ठेवण्याची मागणी केली. यावर पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.

17 ते 26 जून दरम्यान उत्सव
नगर शहरातील मोहरम उत्सव देशभरात प्रसिद्ध मानला जातो. यंदा उत्सवाला 17 जूनपासून प्रारंभ होणार असून 26 जूनपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आणि मिरवणुका पार पडणार आहेत. 21 जून रोजी मोहरमची पाचवी असून त्यादिवशी कोठला परिसरात सवारी स्थापना केली जाणार आहे. 25 जून रोजी रात्री मुख्य ठेंभा मिरवणूक निघणार आहे. दुसऱ्या दिवशी 26 जून रोजी दिवसभर मिरवणुका सुरू राहणार असून रात्री सावेडीभाग येथे सवारी विसर्जन केली जाणार आहे. यंदा एकूण 27 सवारी मोहरम उत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

डॉ. टिपरसे यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या मिरवणूक मार्गाचाच वापर करण्यात यावा. ऐनवेळी मार्ग बदलण्याचा प्रयत्न केल्यास किंवा पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेडिंगची मोडतोड केल्यास संबंधितांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच उत्सव काळात सोशल मीडियावर विशेष वॉच ठेवण्यात येणार असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles