अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी जेरबंद; 24 तासांत अटक
शेवगाव, : अल्पवयीन मुलीला वारंवार फोन करून व प्रत्यक्ष भेटून मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील फरार आरोपीला शेवगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत सातारा जिल्ह्यातील वाई येथून ताब्यात घेऊन अटक केली.
घटनेची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवगाव येथील फिर्यादीच्या अल्पवयीन नातीला आरोपी सोहेल राजू शेख (रा. इंदिरानगर, शेवगाव) हा वारंवार फोनद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून मानसिक त्रास देत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित अल्पवयीन पीडितेने दि. 31 मे 2026 रोजी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच आरोपी सोहेल शेख हा फरार झाला होता.
तीन पथकांद्वारे शोध
आरोपीच्या शोधासाठी शेवगाव पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली होती. आरोपीचा गेवराई-बीड, छत्रपती संभाजीनगर तसेच सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक बनले होते.
दि. 13 जून रोजी शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी सातारा जिल्ह्यातील वाई येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गोपनीय माहिती, तांत्रिक पुरावे व तपासाच्या आधारे पोलीस पथकाने वाई येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला शेवगाव पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कळुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक कोटे, पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर, पोलीस हवालदार आबासाहेब गोरे, चंद्रकांत कुसारे, पो. कॉ. आदिनाथ शिरसाट, राहुल खेडकर, अस्लम शेख, शाम गुंजाळ, ईश्वर बेरड, राजू बडे, भगवान सानप, वसंत वैद्य व राहुल आठरे यांनी केली.


