राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंड केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली देखील सुरू असल्याचं बोललं जात आहे.
या बंडखोर खासदारांपैकी चार जण दिल्लीत दाखल झाल्याचं बोललं जात आहे. हे खासदार आता लवकरच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सभागृहात त्यांना एक स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची विनंती यावेळी ते ओम बिर्ला यांच्याकडे करण्याची शक्यता आहे.
या ‘ऑपरेशन टायगर’वरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत बंडखोर खासदारांना मोठा इशारा दिला आहे. ‘प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल’, असं म्हणत संजय राऊत यांनी ‘ऑपरेशन टायगर’वरून जोरदार हल्लाबोल केला आहे.“नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान उतरतं. ‘ऑपरेशन टायगर’च्या नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जातं. यांची रिक्षात फिरण्याची औकात नव्हती. खासगी विमानाने फिरण्याएवढी किंमत ‘ठाकरे नावा’मुळे वाढली. प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल. डरपोक कोल्ह्यांच्या पळवापळविला ऑपरेशन टायगर का म्हणता?”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


