जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे बनावट दूध निर्मितीचे रॅकेट उघडकीस आले. आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एलसीबीचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाला गती आली असून, एक रात्रीत सात संशयितांना पोलिसांनी अटक केली. आता अटक आरोपींची संख्या 14 झाली आहे.हरिदास एकनाथ गोपाळघरे (वय 34, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड), सद्दाम कमरूद्दीन शेख (वय 29), चंद्रकांत आण्णा बर्डे (वय 36, दोघे रा. उंबरे, ता. राहुरी), महेश तुकाराम मोकाटे (वय 25, रा. इमामपूर, ता. अहिल्यानगर), लक्ष्मण पोपट करंजुले (वय 31, रा. पाडळी रांजणगाव, ता. पारनेर), किशोर काशिनाथ पुंड (वय 46, रा. भोकर, ता. श्रीरामपूर), सर्जेराव काशिनाथ म्हसे (वय 45, रा. शिलेगाव, ता. राहुरी), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.एलसीबी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करीत 14 फेब्रुवारी रोजी छापा घालून बनावट दुधाचे रॅकेट उघडकीस आणले. एलसीबीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग यांनी गुन्ह्याचा तपास करून 41 संशयित निष्पन्न केले. गेल्या चार महिन्यात त्यात केवळ सात जणांना अटक करण्यात आली
दरम्यान, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एलसीबीचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाला गती मिळाली. एलसीबीच्या पथकाने एक रात्रीत वरील सात संशयितांना अटक केली. आता अटक आरोपींच्या संख्या 14 झाली आहे. तपासात संशयितांनी बनावट दूध निर्मितीसाठी आवश्यक रसायने, पावडर आणि अन्य साहित्याचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. काही संशयितांनी घातक रसायनांपासून कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री केल्याचे, तर काहींनी त्याचे संकलन व वितरण केल्याचेही समोर आले आहे..
दरम्यान, गुन्ह्याचा तपासात सात जणांविरोधात सुमारे 850 पानी दोषारोपपत्र जामखेड न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी चौघांना जामीन मिळाला असून तिघे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. नव्या कारवाईनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 14 वर पोहोचली आहे. अद्याप 27 संशयित पसार असून त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या काळात आणखी अटकसत्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून, बनावट दुधाचा ओघळ नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे जिल्ह्यात जाण्याची शक्यता आहे.


