ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा कालपासून रंगताना दिसली. यादरम्यानच ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, मी दिल्लीत नाही तर पुण्यात आहे. मात्र, यावेळी ठाकरे यांच्यासोबतच राहणार का? यावर बोलणे ओमराजे निंबाळकर यांनी टाळले. ज्यामुळे आता ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.यादरम्यानच धाराशिवकर या निर्णयानंतर ओमराजे निंबाळकर यांना नाकारताना दिसत आहेत. रील स्टार ओमराजेंना नेटकऱ्यांनी नाकारल्याचे दिसतंय. एका दिवसात ओमराजेंना सोशल मीडियावर 6 हजार फॉलोअर्सने अनफॉलो केले. हा ओमराजेंना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वीच ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ मुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. या कथित बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर ठाकरे गटाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना ‘व्हीप’ जारी केला असून गुरुवारी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता खासदार ओमराजे निंबाळकर प्रतिक्रिया समोर आली आहे.
ओमराजे निंबाळकर म्हणाले, “मी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. सध्या माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ‘पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण’ सर्वात महत्त्वाचे आहे. या प्रकरणाचा महत्त्वाचा निकाल 20 जून रोजी येणार आहे. हा निकाल आल्यानंतरच मी माध्यमांशी संवाद साधून माझी पुढील अधिकृत भूमिका मांडेल. तोपर्यंत मी इतर कोणत्याही गोष्टीवर बोलणार नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. तसेच ओमराजे निंबाळकर दिल्लीत नसून सध्या आपल्या कुटुंबासह पुण्यातच असल्याची माहिती त्यांनी दिलीय.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य बंडखोरीच्या वृत्तामुळे धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंना एकदा आमदार आणि दोनदा खासदार करून भरभरून दिले, तरीही त्यांनी गद्दारी केल्यास ते सहन केले जाणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख बंडू आदरकर आणि सुरेश गवळी यांनी आक्रमक पवित्रा घेत, “ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ते जिल्ह्यात दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला शेण फासू,” असा थेट इशारा दिला आहे. आता संपूर्ण राज्याचे लक्ष 20 जून रोजी लागणाऱ्या पवनराजे केसच्या निकालाकडे आणि त्यानंतर ओमराजे काय निर्णय घेतात याकडे लागले आहे.


