मोहरम सण शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी शहर पोलिस उपविभागाने मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मोहरम मिरवणुकीच्या कालावधीत शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी तब्बल ४३२ जणांवर तडीपार करण्यात आले आहे. मोहरम मिरवणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने शहरात सुरक्षा व्यवस्था कडक केली असून विविध उपाययोजना राबवल्या आहेत. पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कडक पावले उचलली आहेत. मोहरम मिरवणूक कालावधीत ४३२ जणांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे, तर ६ जणांना ६ महिन्यांकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच एकूण ४७४ जणांकडून, तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या १३ जणांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे.
समाजात जातीय सलोखा राहावा यासाठी शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, धर्मगुरू, यंग पार्टी, सवारी बसवणारे कार्यकर्ते, डीजे चालक-मालक आणि फ्लेक्स बोर्ड तयार करणारे यांच्यासह विविध शासकीय विभागांच्या एकूण ५३ बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत.शहरात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चोवीस तास सर्वेक्षण केले जाणार आहे. कोणीही सोशल मीडिया किंवा प्रत्यक्षरीत्या अफवा पसरवल्या, गैरकृत्य केले अथवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शहरातील मिश्र लोकवस्ती, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांमध्ये चोख बंदोबस्त असेल. ‘कत्तल की रात’ आणि ‘विसर्जन मिरवणुकी’साठी खालीलप्रमाणे बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी मोहरम मिरवणूक शांततेत होण्यासाठी विशेष लक्ष घातले आहे. मात्र, कोतवालीचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य, भिंगार कॅम्पच्या सहायक पोलिस निरीक्षक तेजस्विनी थोरात, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्यावर बंदोबस्ताची मदार आहे. बंदोबस्तात अपर पोलिस अधीक्षक २, उपविभागीय पोलिस अधिकारी ५, निरीक्षक २१, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक ६०, अंमलदार ८५०, होमगार्ड १५०, एसआरपीएफ व आरसीपीचे एक प्लाटून यांचा समावेश असेल.


