कर्जत, : कर्जत तालुक्यातील राशीन येथील एका माध्यमिक विद्यालयातील 15 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी मुख्याध्यापक रामराव प्रभाकर भोसले वय 54, रा. ता. कर्जत यांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने छळाचा आरोप
घटनेतील आरोपी भोसले यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना कर्जत न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापकाने संबंधित विद्यार्थिनीशी वाढदिवसाच्या निमित्ताने भेटवस्तू देऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संधी साधून तिला चुकीचे प्रश्न विचारून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. ‘परिक्षेत गुण कमी का पडले, कळले ना तुला’ अशा शब्दात बोलून तिचा छळ केला. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही आरोपीचे वर्तन थांबले नाही. घाबरलेल्या विद्यार्थिनीने तेथून तातडीने पळ काढला.
पालक संतप्त, पोलिसांचा तपास सुरू
या घटनेनंतर संतप्त पालक शाळेत एकत्र आले होते. मुलींना शाळेत कसे पाठवायचे? या घटनेमुळे मुली घाबरल्या आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी भेट देऊन ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विचारपूस करत आरोपी मुख्याध्यापकाच्या मुसक्या आवळल्या.
गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप वसावे करीत आहेत. पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब चव्हाण यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तक्रार असल्यास तातडीने संपर्क करण्याचे आवाहनही पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी केले आहे.
या गुन्ह्यातील आरोपीची पत्नी पोलीस पाटील आहे.


