पाथर्डी, 25 जून 2026: शिक्षक, ग्रामस्थ आणि प्रशासन या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने जिल्हा परिषद शाळेचा चेहरामोहरा कसा सकारात्मक बदलू शकतो, याचं बोलकं उदाहरण म्हणजे रूपलाचातांडा ही जिल्हा परिषद शाळा. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांची वाट पाहत ओस पडलेली ही शाळा आता चिमुकल्यांच्या किलबिलाटाने आनंदी झाली आहे.
2 विद्यार्थ्यांपासून परिवर्तनाची सुरुवात
श्री. जयराम सातपुते सर आणि त्यांची पत्नी सौ. दिपा सातपुते या शिक्षक दांपत्याची 6 महिन्यांपूर्वी रूपलाचातांडा या जिल्हा परिषद शाळेवर प्रशासकीय बदली झाली. बदलीनंतर त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे पटसंख्येचा. गावातील अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी स्थलांतर केल्यामुळे केवळ 2 विद्यार्थी या शाळेत उरले होते. शाळा शेवटच्या घटका मोजत होती.
करंजीजवळील भटेटवाडी या पूर्वीच्या शाळेतही त्यांनी 4 पटावरून 1 वर्षात 40 पर्यंत पट वाढवला होता, त्यामुळे शिक्षण संघर्षाचा वारसा त्यांच्यासोबत होता.
वैविध्यपूर्ण उपक्रमांनी विश्वास निर्माण केला
दुर्गम भागातही दर्जेदार व आधुनिक पद्धतीचे शिक्षण द्यायचे हा ध्यास मनात धरून या शिक्षकांनी हार न मानता वैविध्यपूर्ण उपक्रम राबवायला सुरुवात केली. पालकांच्या भेटी घेऊन त्यांना शाळा बदलाचं स्वप्न दाखवले. उपलब्ध मुलांसह अंगणवाडीतील मुलांवरही शैक्षणिक उपक्रम राबवले. त्यामुळे अल्पकाळातच मुलांमध्ये सकारात्मक बदल घडून आला. आपल्या तांड्यातच मुलांना इंग्लिश मीडियमपेक्षा उच्च दर्जाचे शिक्षण मिळू लागल्याचा विश्वास ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला.
भिल्ल वस्तीच्या मुलांसाठी स्वतःची गाडी
गावाशेजारी 3-4 किलोमीटर अंतरावर भिल्ल समाजाची वस्ती आहे. तेथील मुले पालकांसोबत भटकंती करतात त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांची भेट घेऊन शिक्षणाचे महत्त्व समजावले. अंतर जास्त असल्याने मुले पायी येऊ शकत नव्हती आणि पालकांकडे वाहतुकीचे साधन नव्हते. पालकांची इच्छा व मुलांची तळमळ पाहून या दांपत्याने त्या लेकरांना स्वतःच्या गाडीत शाळेत घेऊन जाण्याचे व पुन्हा सोडण्याचे आश्वासन दिले.
या प्रयत्नांना पालक, ग्रामस्थ आणि प्रशासनाची आश्वासक साथ मिळाली. जयराम सर, दिपा मॅडम, पालक, ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या सहकार्याने एक-एक करता या शाळेत आता 14 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आपल्या तांड्यातच दर्जेदार शिक्षण मिळू लागल्याने स्थलांतर केलेल्या पालकांचे पायही पुन्हा तांड्याकडे वळू लागले आहेत.
“भविष्यातील स्पर्धा पाहता आम्ही आमच्या मुलाला इंग्लिश मीडियम शाळेत घालण्याचा निर्णय घेतला होता, परंतु जवळच्या रूपलातांड्याच्या जिल्हा परिषद शाळेत खूप सुंदर शिक्षण मिळत आहे हे ऐकले व निर्णय बदलून मुलाला सुटीपूर्वीच या शाळेत दाखल केले. खरोखर केवळ दोन महिन्यातच मुलामध्ये झालेली शैक्षणिक प्रगती आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया धनगरवाडी येथील पालक श्री. अभिमन्यु चितळे यांनी दिली.
“जि.प. रूपलातांडा शाळेस मी नुकतीच भेट दिली. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या या शाळेत आज 14 विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत हे पाहून अतिशय आनंद वाटला. शिक्षकांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांच्या सहकार्याची जोड मिळाली तर अशक्य काहीच नाही हेच रूपलातांडा शाळेने दाखवून दिले आहे”, असे मत पाथर्डीचे गटशिक्षणाधिकारी श्री. शिवाजी कराड यांनी व्यक्त केले.
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. शिवाजी कराड, केंद्रप्रमुख श्री. बाळासाहेब पोळ, माजी सरपंच विजय राठोड, धनगरवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. किशोर राठोड, ग्रामसेवक श्री. गोपिचंद रोंधे यांच्यासह शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या एकजुटीने आज रूपलाचातांडा ही शाळा ग्रामीण भागातील लेकरांना स्वप्न दाखवणारी मॉडेल शाळा बनू पाहत आहे.


