खेळण्यासाठी पत्र्याच्या छतावर गेलेल्या 14 वर्षीय शाळकरी मुलाला विजेच्या झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील सडे येथे दि. 28 जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
यशदिप कृष्णा झडे, वय 14 वर्षे, हा मुलगा राहुरी तालुक्यातील सडे येथील झडे वस्ती येथे राहत असून तो विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय या शाळेत इयत्ता 6 वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दि. 28 जून 2026 रोजी रविवारी शाळेला सुट्टी असल्याने सकाळी 11.30 वाजे दरम्यान यशदिप हा त्यांच्या घराच्या पत्र्याच्या छतावर खेळण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याला विजेचा जबरदस्त शॉक लागून तो जागीच गतप्राण झाला. घटना लक्षात येताच परिसरातील काही तरुणांनी त्याला ताबडतोब राहुरी (Rahuri) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून उपचारा पूर्वीच मयत घोषित केले. त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले.
या प्रसंगी नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान यशदिप याच्या आई- वडीलांनी मुलाचा मृतदेह पाहताच ते बेशुद्ध झाले. त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे सडे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटने बाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
—————————————————————————————————-


