राज्यात येत्या काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी हवामानाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मतानुसार जुलै महिन्यात 8 तारखेपर्यंत राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर, सांगली जिल्हा, लातूर, धाराशीव या जिल्ह्यातील लोकांसाठी खुशखबर आहे. आगामी तीन दिवसांत या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस दोन ते तीन दिवस पडेल. त्यानंतर या भागात रिमझिम स्वरुपाचा पाऊस असेल. तसेच राज्यात मात्र 1 जुलैपासून पाऊस धुमाकूळ घालणार, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात राज्यात पाऊस होणार आहे, असेही डख यांनी सांगितले.मुंबई, पुणे, अकोले, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागातील शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात काळजी घ्यावी. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस असेल. अतिवृष्टी होऊ शकते. पुण्यातही अतिवृष्टी होऊ शकते. शिर्डी, राहता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, फुलंब्री या पट्ट्यातही जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
अहिल्यानगरातील धरणं भरून जातील
विदर्भातही आठ जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस होईल. वर्धा, नागपूर, वाशीम, भंडारा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, अमरावती या भागातील शेतकऱ्यांनी जमिनीत ओल झाली की पेरणी करून टाकावी. अहिल्यानगरातील धरणं भरून जातील. ज्या भागात अजूनही पाऊस आलेला नसेल तर एक आणि आठ जुलै या काळात त्या भागात पाऊस पडू शकतो, असे डख यांनी सांगितले आहे.


