सततच्या पावसाच्या सरींनी जनजीवन विस्कळीत; शालेय विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ
अहिल्यानगर : शहरात आज पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळच्या वेळेत पावसाचा जोर कायम राहिल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा वेग मंदावला, तर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
शाळा सुरू होण्याच्या वेळेतच पाऊस सुरू असल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक विद्यार्थी रेनकोट व छत्रीच्या साहाय्याने शाळेत पोहोचले, तर लहान मुलांना पालकांनी स्वतः शाळेत सोडण्यासाठी धावपळ केली. काही ठिकाणी शाळेबाहेर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागले.
शहरातील सखल भाग, चौक आणि अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. कार्यालयीन वेळ असल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांनाही पावसाचा सामना करत प्रवास करावा लागला. .


