सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मिरजेतील प्रभाग 20 मधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. यामुळे त्यांचे पद धोक्यात आले आहे. पूर्वाश्रमीच्या अश्विनी दत्तात्रय कांबळे या नावाने त्यांना यापूर्वी देण्यात आलेले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तात्काळ जप्त करण्याचे आदेश पुणे विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने दिलेत. या आदेशाचे प्रत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे.
पुणे विभागाच्या अनुसूचित जमाती समितीच्या या निर्णयामुळे अश्विनी कोळी यांचे नगरसेवक पद रद्द केले जाणार आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून प्रभाग 20 मधून अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या गटामध्ये अश्विन कोळी यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडून देखील आल्या आहेत.
येथे अश्विनी कोळी या विजयी झाल्या होत्या आणि शिवसेनेचे उमेदवार विकास सूर्यवंशी यांना दोन नंबरची मते मिळाली. मात्र नगरसेविका अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतर अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे आता स्पष्ट झालंय.
महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये प्रभाग क्रमांक 20 हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होता. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अश्विनी कोळी यांनी निवडणूक लढवली होती. त्या विजयी झाल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध जनसुराज्य शक्ती पक्षाकडून माजी नगरसेविका स्वातीताई पारधी या उभ्या होत्या. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता.
अश्विनी कोळी यांनी सादर केलेलं अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आक्षेप स्वातीताई पारधी यांनी घेतला होता. पारधी यांनी याविरोधात ‘अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे’ यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाची सखोल चौकशी आणि सुनावणी समितीसमोर सुरू होती. यानंतर पुणे जात पडताळणी समितीच्या संचालकांनी आज अखेर आपला अंतिम निकाल घोषित केला.


