राज्यात सलग पाचव्या दिवशी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. आजही राज्यासाठी महत्वाचा दिवस असणार आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे २४ तास राज्यासाठी महत्वाचे असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन केले जात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज पुणे, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचीशक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
आज पुणे, साताऱ्यात जोरदार पाऊस पडेल. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना येले अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सकाळी ७ वाजल्यापासून पुढील ३ तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रात्रीपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरात पहाटेच्या मुसळधार पावसाने पूरसदृश परिस्थिती आहे. शहरातील मध्यवर्ती भागात रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचा वेगवान प्रवाह वाहत आहे.जोरदार पावसात रस्त्यांवर नदीसारखी स्थिती निर्माण झाली आहे.


