डॉ. सुजय विखे पाटील यांची मोठी घोषणा; गणेश कारखान्याची निवडणूक लढवणार नाही

आमची लढाई प्रवरेच्या सभासदांच्या हक्काच्या पैशांसाठी : डॉ. सुजय विखे पाटील

गणेश कारखान्याबत डॉ. सुजय विखे पाटील यांची मोठी घोषणा; निवडणूक न लढवण्याचा निर्णय, न्यायालयीन लढा सभासदांच्या हितासाठीच

राहाता : प्रतिनिधी

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट घोषणा केली की, आम्ही गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुन्हा लढविणार नाही. आमचे कार्यकर्तेही ती निवडणूक लढवणार नाहीत. कारखाना तुमचाच आहे.

मात्र, गणेश कारखान्याशी संबंधित न्यायालयीन वादाबत भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, आमची लढाई कोणत्याही व्यक्ती विरोधात अथवा कोणतीही संस्था बंद पाडण्यासाठी नाही. तर आमची लढाई प्रवरा कारखाना सभासदांच्या हक्काच्या पैशांसाठी आहे. ते पैसे ना. राधाकृष्ण विखे पाटील किंवा डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाहीत, तर प्रवरा कारखान्याच्या सभासदांचे आहेत. सभासदांनी उभे केलेल्या त्या पैशांचे संरक्षण करण्यासाठीच आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत.

राहाता येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राहाता व गणेश परिसरातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊस प्रश्नावर विरोधकांना प्रत्युत्तर देताना डॉ. विखे म्हणाले, ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा, हा निर्णय शेतकऱ्यांचा आहे. गणेश कारखाना आम्ही चालवत असताना इतर कारखान्यांनी आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळविला होता. मग आता आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेनुसार ऊस देण्यास विरोध का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक वाद नाही. कोपरगावमध्ये दोन आमदार झाले, त्याचा आनंदच आहे. त्यांनी विकासाची कामे करावीत. विरोधकांच्या भाषणांवर वेळ घालवण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

राहाता शहराच्या विकासाबत विश्वास व्यक्त करताना डॉ. विखे म्हणाले, आजचे राहाता आणि दोन वर्षांनंतरचे राहाता शहर यात मोठा फरक दिसेल. शहराचा विकासात्मक चेहरामोहरा बदलून जाईल. विकासकामांवरच आमचा भर राहणार आहे.

भाजपच्या संघटन शक्तीवर विश्वास व्यक्त करत ते म्हणाले, जोपर्यंत कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि विखे पाटील यांच्या नेतृत्वाला कोणताही धक्का लागू शकत नाही.

शेवटी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करत विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवू नका. आपले राजकारण विकास, प्रगती आणि लोकांच्या विश्वासावर उभे आहे. शांत राहा आणि विकासाची कामे करत राहा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles