राहाता: शिर्डी येथिल श्री साईबाबा संस्थानने ‘व्हीआयपी’ भाविकांसाठी सुरू केलेल्या ब्रेक दर्शनासाठी (झटपट दर्शन) २०० रूपये आकारले जात होते. आता या शुल्कात १०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. त्यामुळे या दर्शनासाठी प्रतिव्यक्ती ३०० रुपये मोजावे लागणार आहेत. आज, गुरूवारपासून हे नवीन दर लागू केले आहेत.
यामूळे संस्थानच्या तिजोरीतही अल्पशी भर पडणार आहे. संस्थानतर्फे सकाळी, दुपारी आणि रात्री अशा तीन वेगवेगळ्या वेळेत जनसंपर्क कार्यालयामार्फत २०० रुपये शुल्कात ‘ब्रेक दर्शन’ दिले जाते. दुसरीकडे, सर्वसामान्य भाविकही दर्शन संकुलातील प्रवेशद्वार क्रमांक ६ व ७ मधून २०० रुपये मोजत होते. मात्र, झटपट दर्शनाची रांग पुढे जाऊन मुख्य रांगेत मिसळत असल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत होता, तर तितकेच पैसे देऊन ब्रेक दर्शनासाठी आलेल्या भक्तांना थेट दर्शन, गंध व तिर्थ या सुविधा मिळत होत्या. रांगेत असलेल्या सामान्य भक्तांना मनासारखे दर्शन मिळत नाही. मंदिरात असलेले सुरक्षा रक्षक त्यांना ढकलत असतात. त्यामूळे भक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत असते. संस्थान प्रशासनाने भेदभाव करू नये, अशी मागणी आहे.
सशुल्क दर्शन, आरती घेणाऱ्या भाविकांच्या तुलनेत ब्रेक दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या केवळ सव्वापाच टक्के आहे तर साई मंदिराला भेट देणाऱ्या एकूण भाविकांच्या तुलनेत हे प्रमाण अवघे अर्धा ते पाऊण टक्का आहे. ब्रेक दर्शनाचे शुल्क वाढवतानाच सामान्य रांगेप्रमाणेच ब्रेक दर्शनाच्या प्रतिक्षा कक्षातही भाविकांसाठी चहाची व्यवस्था करण्यात येणार आहे. दुसरीकडे जे सामान्य भाविक २०० मोजून रांगेत जाऊन सशुल्क दर्शन घेतात त्यांना बहुतेकदा मनस्तापाला सामोरे जावे लागते. पैसे भरूनही हवे तसे झटपट दर्शन होत नाही. यातही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या भाविकांसाठी किमान नंदीमूर्तीपर्यंत तरी थेट स्वतंत्र रांग असावी, जेणेकरून पैसे देऊनही होणारा मनस्ताप थांबेल व अधिक भाविक या सुविधेचा लाभ घेतील.


