महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ६ खासदारांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. या सर्व घडामोडी दरम्यान ‘ऑपरेशन टायगर’ची मोठी चर्चा झाली. त्यानंतर काही दिवसांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या ऑफरबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांनी जोर धरला होता.
या घडामोडीनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांबाबत काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा दावा केला आहे. ‘शरद पवारांचे ५ ते ६ खासदार अस्वस्थ असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षासारखी अवस्था शरद पवारांच्या पक्षाची होऊ शकते’, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
“चिंताजनक बातमी निश्चित आहे, त्यांचे (शरद पवारांची राष्ट्रवादी) ५ ते ६ खासदार अस्वस्थ आहेत. आता ते खासदार काय करतील माहिती नाही. पण त्यासाठी त्यांच्यामागे मोदी-शाह सरकार हात धुवून मागे लागलेलं आहे. विरोधी पक्ष अस्तित्वातच नसावा अशी त्यांची (मोदी-शाह यांची) इच्छा आहे. जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं केलं तेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही होऊ शकतं”, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.शरद पवारांच्या ५ ते ६ खासदारांना भारतीय जनता पक्षात घेण्याचा प्रयत्न आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत? असा प्रश्न पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारला. यावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “मला ते माहिती नाही. मात्र, ते सोडून जाण्याच्या परिस्थितीत किंवा ते अस्वस्थ आहेत, एवढंच मी म्हणत आहे. आता ते सोडून जातील की नाही? हे देखील मला माहिती नाही. मात्र, ते खासदार अस्वस्थ आहेत एवढं मी ऐकत आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.


