आपल्या नवनवीन कल्पना आणि देशातील रस्ते वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ओळखले जाणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशातील महत्त्वाकांक्षी ‘लखनऊ-कानपूर एक्सप्रेसवे’चे उद्घाटन करताना त्यांनी भविष्यातील आपल्या एका मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्लॅनचा खुलासा केला आहे. देशात मी आता हवेत उडणारी बस आणणार आहे, असे गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बहुप्रतीक्षित 63 किलोमीटर लांबीचा लखनऊ-कानपूर एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवास प्रचंड सुकर आणि वेगवान होणार आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींनी त्यांची पुढील संकल्पना स्पष्ट केली.एक्सप्रेसवेच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले, “मी देशात नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान , रोप-वे आणि केबल कार घेऊन आलो आहे. मी यापूर्वी पाण्यात उतरणारे विमान देखील आणले होते. आता माझा पुढचा प्लॅन हवेत उडणारी बस आणण्याचा आहे.”
ते पुढे म्हणाले, “हवेत उडणाऱ्या बससाठी मी मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑन इलेक्ट्रिसिटी तयार करून देणार आहे, कारण हा विभाग माझ्याच अखत्यारीत येतो. या तंत्रज्ञानामुळे प्रवासी एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात कधी पोहोचले, हे त्यांचे त्यांनाच कळणार नाही. लवकरच मी याची सुरुवात करणार आहे.”
https://x.com/rajeshemmc/status/2077006463499919501?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2077006463499919501%7Ctwgr%5E9cad7485d6e40ecc0c129a4191f20b90b69a39ad%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Findia%2Fnitin-gadkari-flying-bus-electric-mass-rapid-transport-lucknow-kanpur-expressway-ethanol-20-marathi-news-1431790


