अहिल्यानगरमध्ये आणखी एका मल्टीस्टेट पतसंस्थेत ठेवीदारांची फसवणूक; चेअरमनसह संचालकावर गून्हा दाखल

अहिल्यानगर -गुंतवणूकदारांना आकर्षित करून त्यांच्या कष्टाची कोट्यवधी रुपयांची ठेव हडप केल्याचा खळबळजनक प्रकार अहिल्यानगरमध्ये समोर आला आहे. श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात आणि बुरुडगाव रस्त्यावरील चाणक्य चौक शाखेत हा मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या चेअरमन आणि संचालकांसह एकूण सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतिष रामचंद्र पटारे (वय 54, धंदा- ड्रायव्हर, रा. गुगळे कॉलनी, बु-हानगर, अहिल्यानगर) आणि इतर काही साक्षीदारांनी या पतसंस्थेमध्ये आपली हक्काची रक्कम मुदत ठेव आणि फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवली होती. सर्व गुंतवणूकदारांची मिळून एकूण 2 कोटी 44 लाख 42 हजार 377 रुपये एवढी रक्कम संस्थेकडे जमा होती. या ठेवींची मुदत संपल्यानंतर फिर्यादी आणि इतर ठेवीदारांनी पतसंस्थेकडे आपल्या हक्काच्या पैशांची मागणी केली. मात्र, पतसंस्थेच्या प्रशासनाने ही रक्कम व्याजासह परत करण्यास स्पष्ट नकार दिला.

भगवानबाबा पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवीदारांच्या पैशांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून संपूर्ण संस्थेची आणि गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संस्थेच्या चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, व्हाईस चेअरमन मथुर रंगनाथ वैद्य, संचालक नितीन सोपानराव तुपे, शांतीनाथ नागनाथ साखरे, राम लक्ष्मण पोपळघट, किशोर अनिल सुरवसे आणि संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जयशाली मयुर वैद्य (सर्व राहणार बाळमटाकळी, शेवगाव व अहिल्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पांडुरंग मेढे आणि गणेश देशमुख पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles