शेतकऱ्यांसाठी उभारलेले शेतकरी भवन ठरणार हक्काचे निवासस्थान- प्रा. राम शिंदे
जामखेड बाजार समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे लोकार्पण संपन्न
अहिल्यानगर, दि.२२- शेतकरी माल विक्रीसाठी बाजार समितीत आल्यानंतर त्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निवासस्थान मिळावे, या उद्देशाने उभारण्यात आलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन हे शेतकऱ्यांसाठी हक्काचे निवासस्थान ठरेल. शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यास राज्य शासन सर्वोच्च प्राधान्य देत असून अशा लोकाभिमुख विकासकामांना शासनाकडून भविष्यातही आवश्यक सहकार्य दिले जाईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
जामखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रा.राम शिंदे बोलत होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, पणन संचालक शरद जरे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे,
सहाय्यक निबंधक तथा बाजार समिती सचिव दिलीप तिजोरे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने शेतकरी भवनास प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर अल्पावधीतच दर्जेदार व भव्य इमारत उभारून अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली आहे. या कामाची गुणवत्ता आणि नियोजन कौतुकास्पद आहे. शेतकरी माल विक्रीसाठी बाजार समितीत आल्यानंतर मुक्कामासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या भवनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून बाजार समित्यांनी केवळ व्यापारापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या सर्वांगीण सुविधांवर भर द्यावा, असेही ते म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे ध्येय समोर ठेवले असून महाराष्ट्राने विकासाच्या या प्रवासात अग्रणी भूमिका बजावावी. शासन, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून शासनाच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. याच उद्देशाने राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येत असून कर्जत तालुक्यातही त्याचे प्रभावी आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन सातत्याने कार्यरत असून हरभरा, उडीद, मका आणि कांदा या पिकांची नाफेड व संबंधित यंत्रणांमार्फत किमान आधारभूत किंमतीने (एमएसपी) खरेदी सुरू आहे. बाजारभाव घसरल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी शासन प्रभावी उपाययोजना राबवत असल्याचेही ते म्हणाले.


