अहिल्यानगर, दि. २४ : अहिल्यानगर येथील बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर येथील स्वामी समर्थ केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे रविवारी (ता. २५ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत २५ हजार भाविकांचा सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
केंद्रांचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या पुढाकारातून हा अभिनव उपक्रम साकारणार आहे. तब्बल २५ वर्षांपूर्वी हे केंद्र सुरु झाले. प्रारंभी परिसरातील विरळ वस्तीमुळे भाविकांची संख्या मर्यादित होती. पण हळूहळू या केंद्रात भाविकांचा ओघ वाढू लागला. व्यसनाधीनतेच्या आहारी जाण्याच्या तसेच नैराश्येच्या मार्गांवर असलेल्या तरुण पिढीला स्वामींचे विचार भावले. साहजिकच या केंद्रात सेवा देणा-यांची संख्या वाढू लागली. जवळ कमी पैसे असतानाही व्यसनांचा मार्ग न अवलंबविता अनेक तरुणांनी अध्यात्मात झोकून देत उद्योग-व्यवसाय करण्यात व नोकरी मिळविण्यात यश मिळविले.
केंद्रातील बाल संस्कार विभागासह सर्व १८ विभागांच्या माध्यमातून सर्वंकष समाज घडविण्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने झाले. त्यामुळेच सध्या या केंद्रात मोठ्या प्रमाणात सर्व स्तरातील भाविकांची मोठी वर्दळ असते. आता बोल्हेगाव परिसरातील नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी बोल्हेगाव स्वामी समर्थ सेवा केंद्रात परिसरातील भक्तगणांसह जिल्ह्यातून व परजिल्हयातूनही भाविक मंडळी केंद्रात आवर्जून हजेरी लावत असतात. विशेषत: गुरुवार व रविवार या दिवशीची गर्दी उच्चांकी असते. अनेकांना स्वामींच्या सेवेची अनुभूती मिळाली आहे. भरकटण्याच्या स्थितीतील अनेकांना सन्मार्गाला लावण्याचे काम स्वामींच्या आशीर्वादाने या केंद्राच्या माध्यमातून झाले आहे. या बाबीचे आपणास व केंद्रातील सर्व सेवेकरी यांना मोठे समाधान असल्याचे चंद्रशेखर काका लोळगे यांनी सांगितले.
या सर्व पार्शवभूमीवर बोल्हेगाव फाटा येथील स्वामी समर्थ केंद्रात रविवारी ( ता. २६ जुलै) रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत २५ हजार भाविकांचा सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून, त्यात आबाल-वृद्धांसह सर्व वयोगटातील भाविकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन चंद्रशेखर काका लोळगे यांनी केले आहे.


