वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाला गती; शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार
टप्पा दोनच्या कामाकडे माझे विशेष लक्ष; ३२ तलावांना लवकरच पाणी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; आ. अक्षय कर्डिले
पांढरीपूल येथे कामाची पाहणी; १२ गावांतील ३२ तलावांना मिळणार योजनेचे पाणी
स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न साकार होणार; शेतकऱ्यांच्या आनंदातच खरी श्रद्धांजली ठरणार
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाला आता वेग येणार असून, या योजनेमुळे १२ गावांतील ३२ तलावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पांढरीपूल येथे वांबोरी चारीच्या कामाची पाहणी करून कामाचा शुभारंभ आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. मुळा धरणाची पाणीपातळी ८० टक्क्यांच्या पुढे गेली असून, लवकरच वांबोरी चारीला मुळा धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे वांबोरी चारीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आमदार अक्षय कर्डिले म्हणाले वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाकडे माझे विशेष लक्ष आहे. या टप्प्यात राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघातील १२ गावांतील ३२ तलावांचा समावेश आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळवून देणे, हे माझे प्राधान्य आहे.स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी वांबोरी चारी योजनेसाठी ९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. काम पूर्ण करताना निधीची, प्रशासकीय मंजुरीची किंवा अन्य कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली, तरी ती सोडविण्यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार कर्डिले यांनी दिली. वांबोरी चारीचे पाणी मिळाल्यानंतर या भागातील शेतीला मोठा आधार मिळणार असून, शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला या योजनेमुळे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासह आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही हातभार लागणार आहे.शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवणे हा केवळ विकासकामाचा भाग नसून, त्यांच्या जीवनमानाशी जोडलेला प्रश्न आहे. त्यामुळे वांबोरी चारी टप्पा दोनचे काम कोणत्याही परिस्थितीत रखडू देणार नाही. लवकरात लवकर काम पूर्ण करून १२ गावांतील ३२ तलावांमध्ये पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असेही आमदार अक्षय कर्डिले यांनी स्पष्ट केले. वांबोरी चारी टप्पा दोन पूर्ण झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी” हे उद्दिष्ट प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न साकार होणार; शेतकऱ्यांच्या आनंदातच खरी श्रद्धांजली ठरणार आहे वांबोरी चारी टप्पा दोनचे काम पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, हे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी कायम शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांचे फलित आता वांबोरी चारी टप्पा दोनच्या माध्यमातून प्रत्यक्षात येत असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचणार आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद, बहरणारी शेती आणि पाण्यामुळे समृद्ध होणारे गाव हेच स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल. शेतकऱ्यांचा आनंदोत्सव हाच स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण होणार..


