स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, १५३८ पदांसाठी जम्बो भरती

बँकिंग क्षेत्रात करियर करण्याची इच्छा असणारे अनेक जण असतात. ठराविक तास काम, सुट्ट्या आणि चांगले वेतन यामुळे बँकिंग क्षेत्रात काम करण्यास युवापिढीकडून प्राधान्य देण्यात येते. अशा युवावर्गासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक आनंदवार्ता आणली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरी म्हणजे एक सन्मान समजला जातो. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाकडे पाहिले जाते. या बँकेत नोकरीसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) २०२६ या वर्षात लिपिक (ज्युनियर असोसिएट) पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून याअंतर्गत १ हजार ५३८ पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. अर्ज दाखल करण्याची २७ ऑगस्ट ही अंतिम मुदत असून अर्ज ऑनलाइन दाखल करावे लागणार आहेत.

या भरतीसाठी काही अटी आहेत. उमेदवाराला केवळ एकाच राज्यासाठी अथवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करता येणार आहे. ज्या राज्यासाठी अर्ज करण्यात येईल, त्या राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. लिपिक (ज्युनियर असोसिएट) पदासाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राथमिक परीक्षा होईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी संधी देण्यात येईल. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात स्थानिक भाषेतील प्राविण्य चाचणी (LLPT) उत्तीर्ण व्हावी लागेल. सप्टेंबरमध्ये प्राथमिक परीक्षा होईल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मुख्य परीक्षा होऊ शकते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवारांचे वय १ एप्रिल २०२६ रोजी २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल. अर्ज करताना उमेदवारांनी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सक्रिय ठेवणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील माहिती मोबाईल, ईमेलद्वारे पाठवली जाणार असल्याने उमेदवारांनी ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे.उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि अर्ज दाखल करण्यासाठी SBI Current Openings Portal यावर संपर्क करावा.

स्टेट बँक ऑफ इंडियात लिपिक (ज्युनियर असोसिएट) पदासाठी होणारी पूर्वपरीक्षा १०० गुणांची राहील. ही प्रश्नपत्रिका एका तासात सोडवावी लागणार आहे. पूर्वपरीक्षेतील प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरुपाचे असतील. त्यांची विभागणी तीन प्रकारात केलेली असेल. चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणदान (निगेटिव्ह मार्किंग) असल्याने उमेदवारांनी काळजीपूर्वक प्रश्नपत्रिका सोडवावी.मुख्य परीक्षेत बँकेने किमान गुण निश्चित केले आहेत. तितके गुण मिळवणे उमेदवारास आवश्यक आहे. एखाद्या उमेदवाराने इयत्ता १० वी किंवा १२ वीमध्ये संबंधित राज्याची स्थानिक भाषा शिकली असेल. आणि त्याची नोंद त्यांच्या गुणपत्रिकेत असेल, तर त्यांना स्थानिक भाषेतील प्राविण्य चाचणीतून सवलत दिली जाईल. इतर उमेदवारांना निवडीनंतर भाषा चाचणी द्यावी लागेल, ज्यामध्ये त्यांची वाचन, लिखाण, संभाषण आणि समजण्याची क्षमता तपासली जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles