राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांना पुन्हा नोटीस; पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीला दिले आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान देणारी नोटीस राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी पुन्हा बजावली आहे. पहिली नोटीस ९ जुलै रोजी पाठवली होती. ज्यामध्ये २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांच्या वैधतेला आव्हान देण्यात आले होते.

या नोटीसीला १५ दिवसांमध्ये उत्तर दिले नसल्याने त्याची आठवण करुन देणारी ही नोटीस बजावली आहे. पक्षाचे झारखंड प्रदेशाध्यक्ष राहिलेले सिंग हे राष्ट्रवादीशी १५ वर्षांपासून संबंधित आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये कर्जत येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

२८ फेब्रुवारी, १० मार्च आणि २९ एप्रिल २०२६ रोजी निवडणूक आयोगाला पक्षाकडून पाठवलेली पत्रे मागे घ्यावीत. २६ फेब्रुवारी रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात. १५ दिवसांच्या मुदतीत मागण्या पूर्ण न केल्यास पक्षाची निवडणूक रद्द करण्यासाठी योग्य नियामक मंचांकडे आम्ही जाण्यास मुक्त आहोत, असे असे नोटीसीमध्ये म्हटले आहे.

२६ फेब्रुवारी २०२६ रोजी पक्षाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे. ही निवडणूक घटनाबाह्य आहे. या प्रक्रियेसाठी निवडणूक प्राधिकरण नव्हते. तसेच सचिदानंद सिंह आणि इतर राष्ट्रीय प्रतिनिधीना नामांकन भरणे, निवडणूक लढवणे किंवा मतदान करण्याची संधी देण्यात आली नाही, असा नोटीस पाठवणाऱ्या सिंह यांचा आरोप आहे.

राष्ट्रवादी पक्ष सध्या अडचणीत आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा काही केल्या थांबत नाहीत आणि दुसरीकडे पक्षाध्यक्षाच्या निवडीला आव्हान दिले आहे. त्यातच पक्षामध्ये सुनेत्रा -पार्थ आणि पटेल – तटकरे असे दोन तट पडले आहेत. पक्षाचे आमदार संभ्रमात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष निवडीच्या वैधतेला आव्हान मिळाल्याने पक्षाची मोठी कोंडी झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles