पत्रकार सुशील थोरात यांच्यावर १५
ते २० जणांच्या टोळक्याचा भ्याड हल्ला
सावेडीत क्षुल्लक कारणातून बेदम मारहाण; कारवाईसाठी संघटना आक्रमक
अहिल्यानगर-साम टीव्ही न्यूज वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी सुशील थोरात यांच्यावर १५ ते २० जणांच्या टोळक्याने क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना अहिल्यानगरमध्ये घडली. सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवर एचडीएफसी बँकेजवळ हा प्रकार घडला. या हल्ल्यानंतर थोरात यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच शहरातील पत्रकारांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. शहर विभागाचे उपअधीक्षक दिलीप टिपरसे आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक
बालाजी वैद्य यांनी रुग्णालयात धाव घेत घटनेची माहिती घेतली. दरम्यान, मारहाण करणाऱ्या काही संशयितांची नावे पोलिसांना समजली आहेत.
थोरात यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी पत्रकार
पदाधिकारी आणि सदस्य जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाईची मागणी करणार आहेत. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकत्यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत शहरातील वाढत्या गुंडगिरीवर पोलिसांनी जरब बसवावी, अशी मागणी केली आहे.


