शेतकरी कुटुंबातील मुलीच्या विवाहाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. बँकेच्या शुभमंगल कर्ज योजनेअंतर्गत पात्र शेतकरी खातेदारांना मुलीच्या लग्नासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुलीचं लग्न हा प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र, विवाहासाठी होणारा मोठा खर्च अनेक शेतकरी कुटुंबांसाठी आर्थिक अडचणी निर्माण करतो. अशा वेळेस बऱ्याचदा खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ येते. त्यातून वाढणारा व्याजाचा बोजा कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करू शकतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा बँकेने ‘शुभमंगल’ योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत दिली जाणार असून, पात्र शेतकरी खातेदारांना बँकेच्या नियमानुसार कर्जाचा लाभ घेता येईल.
बँकेच्या वतीने राबविण्यात येणारी शुभमंगल ही योजना काही वर्षांपासून यशस्वीरित्या सुरू आहे. सुरुवातीला ही योजना8% टक्के व्याज दराने , शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी कर्ज रक्कम देत होती. मात्र आता शुभमंगल या योजनेसाठी, बँकेने शून्य टक्के व्याजाने विवाह सोहळ्यासाठी रक्कम देण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती सहकार महर्षी तथा राज्याचे माजी राज्यमंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी दिली आहे.
शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर मुला-मुलींच्या विवाहाचा खर्च मोठे आर्थिक आव्हान ठरतो. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा बँकेने शेतकरी खातेदारांना दिलासा देणारी ही योजना पुढे आणली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना मुलीच्या विवाहासाठी बँकेकडून शून्य टक्के व्याजदराने रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे विवाहाच्या खर्चासाठी खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ शेतकरी कुटुंबांवर येऊ नये, हा या योजनेमागचा उद्देश आहे.
दरम्यान, कर्जाची पात्रता, कमाल कर्जमर्यादा, आवश्यक कागदपत्रे, परतफेडीचा कालावधी आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची अंतिम माहिती बँकेच्या संबंधित शाखेकडून घेणं आवश्यक आहे.


