मोक्कासह ६ गुन्ह्यांतील फरार आरोपीसह तिघे एलसीबीच्या जाळ्यात; दोन गावठी कट्टे जप्त
अहिल्यानगर – पाथर्डी हद्दीतील मोक्कासह ६ गुन्ह्यांत फरार असलेला सराईत गुन्हेगार लक्ष्मण उर्फ लखन कासार याच्यासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने चांदबिबी महाल परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल व एक पल्सर दुचाकी असा एकूण २ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पकडलेले आरोपी –
१) लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार (वय २९, रा. कासारवाडी, ता. पाथर्डी)
२) सचिन राजेंद्र खाडे (वय ३०, रा. तीनखडी, ता. पाथर्डी)
३) अनिकेत दिलीप पटारे (वय २२, रा. धामोरी, ता. नेवासा)
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशावरून एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दि. २५ ऑगस्ट रोजी लखन कासार हा दोन साथीदारांसह चांदबिबी महालाजवळ अहिल्यानगर-पाथर्डी रोडवर गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने कट्टे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. लखन कासार याला उपविभागीय दंडाधिकारी, पाथर्डी यांनी १० जानेवारी २०२५ पासून २ वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्याच्यावर मोक्का, खुनाचा प्रयत्न, दरोडा, पोक्सोसह १७ गुन्हे दाखल आहेत. तर सचिन खाडेवर २ गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७४०/२०२६ आर्म अॅक्ट ३/२५, ७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


