जिल्ह्यात २५२५ शिक्षकांची पदे रिक्त; ३१ ऑगस्टपर्यंत निर्णय नाही तर १ सप्टेंबरपासून लंकेंचे उपोषण
अहिल्यानगर – जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील २५२५ शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याच्या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय व लेखी कृती आराखडा न दिल्यास १ सप्टेंबरपासून जिल्हा परिषद आवारात उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
खा. लंके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्राथमिक व पदवीधर संवर्गातील ४७१ आणि माध्यमिक विभागातील २०५४ अशी एकूण २५२५ पदे रिक्त आहेत. प्रत्येकी २० विद्यार्थी गृहीत धरल्यास ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.
रिक्त पदांमुळे कार्यरत शिक्षकांवर बीएलओ ड्युटी, जनगणना, विविध सर्वेक्षणे, ऑनलाइन पोर्टल, आधार-बँक खाती, पोषण आहार, एफएसएसएआय नोंदणी यांसारख्या अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार पडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.
शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ अशा कामांत जात असल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा प्रश्न केवळ कर्मचारी भरतीचा नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व रिक्त पदांचा शाळानिहाय, विषयानिहाय कृती आराखडा जाहीर करावा, शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करावे, पर्यायी प्रशासकीय व्यवस्था करावी आणि कमतरता असलेल्या शाळांत तात्पुरती शिक्षक व्यवस्था करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
३१ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास १ सप्टेंबरपासून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शिक्षक मिळाला पाहिजे, प्रत्येक शिक्षकाला अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असलेल्या प्रशासनाची उत्तरदायित्व निश्चित झाले पाहिजे, अशी भूमिका खासदार लंके यांनी मांडली आहे.


