नगर तालुक्यात वादातुन तरुणाच्या डोक्यात घातला दगड ; एमआयडीसी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर – तालुक्यातील ससेवाडी येथे सामाईक पाईपलाईनच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससेवाडी येथील रहिवासी दत्तप्रसाद आदिनाथ ससे (वय २४) हे गुरुवारी दुपारी आई-वडिलांसोबत घरात होते. त्यावेळी गावातीलच संभाजी ससे आणि जनाबाई संभाजी ससे हे त्यांच्या घरासमोर आले. तुम्ही सामाईक पाईपलाईनचे बारे तोडले आहेत, ते नीट करून द्या, असे म्हणत त्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. यावर फिर्यादीच्या आईने आम्ही पाईपलाईनचे काहीही नुकसान केले नाही असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
दत्तप्रसाद ससे यांनी मध्यस्थी करत शिवीगाळ करू नका असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. याचा अधिकच राग आल्याने चुलते संभाजी ससे यांनी हातातील दगडाने थेट दत्तप्रसाद यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यामध्ये दत्तप्रसाद हे गंभीर जखमी झाले. मारहाण केल्यानंतर जाताना दोघांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची उघड धमकी दिली.
जखमी दत्तप्रसाद ससे यांच्यावर अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी संभाजी ससे व जनाबाई ससे या दोघांवर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात व हवालदार खामकर करत आहेत.


