नेवाशात भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या कारवर दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल

अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवरून भाजपचे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश वसंत शेटे यांच्या कारला ६० ते ८० जणांच्या जमावाने घेराव घालत दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारची काच फोडून एका व्यक्तीने फळ कापण्याच्या चाकूने गळा कापण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेटे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केला आहे. यातील चौदा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना दि. ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ऋषिकेश शेटे यांनी सोनई पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली. त्यानुसार, नेवासा शहरातील गणपती चौक ते संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हातगाड्यांवरून फळविक्री केली जात असल्याने, वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. अतिक्रमण हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या मागणीसाठी शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सागर झावरे यांना निवेदन दिले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर शेटे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. दुपारी सव्वातीनच्या सुमारास गणपती चौकात मोठा जमाव जमल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शेटे यांच्या फिर्यादीनुसार, ते कारच्या पुढील सीटवर बसले होते. त्यांच्या मागील बाजूस अंगरक्षक अमोल पवार व डॉ. निलेश लोखंडे होते. यावेळी जमावातील आसिफ पठाण व अय्यास बागवान यांनी शेटे कारमध्ये असल्याचे पाहून जमावाला हातवारे केल्याचा आरोप आहे. त्यानंतर जमावाने कारला घेराव घालून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. शेटे यांनी आतून दरवाजा धरून ठेवला असताना काही जणांनी कारवर दगडफेक केल्याने पुढील व मागील काचा फुटून कारचे नुकसान झाले.

याचवेळी अरबाज बागवान याने शेटे यांच्या बाजूची काच दगडाने फोडून फळ कापण्याचा चाकू हातात घेतला, आणि फुटलेल्या काचेतून हात आत घालून गळा कापण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. शेटे यांनी त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला असता चाकू त्यांच्या उजव्या हाताला लागून दुखापत झाल्याचे नमूद आहे. त्यानंतर अंगरक्षक अमोल पवार यांनी कारबाईनच्या बंदुकीचा बट त्याच्या हातावर मारल्याने तो मागे हटल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाची पांगापांग केली आणि शेटे यांच्या कारला घटनास्थळावरून बाहेर काढले. त्यानंतर शेटे हे त्याच कारने सोनई पोलीस ठाण्यात दाखल झाले. हाताला दुखापत झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात जाणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी २२ आरोपींविरुद्ध कारवाई सुरू केली असून त्यापैकी सलमान सज्जु बागवान (वय २७), फरहान दाऊद बागवान (वय २१), मोहम्मद अब्बास बागवान (वय ३०), अराफत हनिफ बागवान (वय २१), आवेज अकबर बागवान (वय २२), राजू बाबू बागवान (वय ३०), रिजवान रशिद बागवान (वय २३), समीर ख्वाजा बागवान (वय २४), अल्ताफ इसाख बागवान (वय ५५), मोहसिन अब्बास बागवान (वय ३०), इम्रान अस्लम पिंजारी (वय २३), अली गणी बागवान (वय २१), अलताफ ख्वाजा बागवान (वय २२) आणि परवेज अफरोज बागवान (वय २५) यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चैतन्य वासवे करीत असून, घटनेतील आरोपांची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles