अहिल्यानगर-वडिलांनी शेतजमीन बक्षीसपत्र करून दिल्याच्या रागातून एका महिलेला दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच हातातील कड्याने मारहाण केल्याची घटना वडगाव गुप्ता (ता. अहिल्यानगर) शिवारातील वनराई कॉलनी परिसरात घडली. अनिता सुर्यभान भांड (वय 41, रा. वडगाव गुप्ता) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना दिलेल्या जबाबावरून एकरूखे, शिर्डी (ता. राहाता) येथील दोघांविरूध्द बुधवारी (2 सप्टेंबर) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बाबासाहेब राधोजी दातीर व अनिकेत बाबासाहेब दातीर (दोघे रा. एकरूखे, शिर्डी, ता. राहाता) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वनराई कॉलनीजवळ ही घटना घडली. फिर्यादी अनिता भांड यांच्या वडिलांनी त्यांना शेतजमीन बक्षीसपत्र करून दिली होती. याचा राग संशयित आरोपींना असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याच कारणातून संशयित आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला आवाज देऊन थांबविले. यानंतर अनिकेत दातीर याने हातातील कड्याने फिर्यादीच्या डोक्यात व कपाळावर मारहाण केली. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. तसेच बाबासाहेब दातीर यानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. दोघांनीही फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


