मांजरी ग्रामसभेत ग्रामविकास अधिकाऱ्याला दमदाटी
भोवळ येऊन पडल्याने ग्रामसभा गुंडाळली
राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील मांजरी येथे ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान ग्रामविकास अधिकारी सुरेश डोंगरे यांना दमदाटी व शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर डोंगरे यांना भोवळ येऊन ते ग्रामसभेतच बेशुद्ध पडल्याने ग्रामसभा वादळी ठरली.
मांजरी येथे दि. ३१ रोजी सकाळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना सुनीता संदीप विटनोर यांनी मद्यविक्री परवान्यासाठी ना हरकत दाखला मिळावा, यासाठी केलेला अर्ज चर्चेसाठी ठेवण्यात आला.
दरम्यान, यापूर्वी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मांजरी गाव तसेच गावच्या शिवारात कोणालाही मद्यविक्री परवान्यासाठी ना हरकत दाखला देऊ नये, असा ठराव करण्यात आला होता. त्यामुळे सदर अर्ज ग्रामसभेपुढे चर्चेसाठी आल्यानंतर ग्रामविकास अधिकारी सुरेश डोंगरे यांनी संबंधित विषयावर ग्रामस्थांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परवाना देण्याच्या बाजूने असलेल्या ग्रामस्थांनी हात वर करून समर्थन दर्शवावे, असे आवाहन करण्यात आले. मात्र, एकाही ग्रामस्थाने हात वर न केल्याने अर्जास मंजुरी देता आली नाही. याचा राग आल्याने संदीप एकनाथ विटनोर व त्यांचे वडील एकनाथ विटनोर यांनी ग्रामसभेचे कामकाज सुरू असताना आपल्याला दमदाटी करून शिवीगाळ केल्याचे ग्रामविकास अधिकारी डोंगरे यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकारानंतर डोंगरे यांना अचानक चक्कर येऊन ते ग्रामसभेतच पडले. ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे ग्रामसभा गुंडाळण्यात आली. परिणामी ग्रामसभेतील इतर विषयांवर चर्चा व निर्णय होऊ न शकल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामविकास अधिकारी सुरेश डोंगरे यांच्या तक्रारीवरून राहुरी पोलिसांनी संदीप विटनोर व एकनाथ विटनोर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.


