अहिल्यानगर-शहरातील नेताजी सुभाष चौकात रविवारी रात्री मिरवणुकीदरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनुप शेखर झाडबुके (वय 30, रा. सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुनील शंकर करांदे (रा. लक्ष्मी कारंजा, अहिल्यानगर) आणि त्याच्या इतर तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळीवाडा ते सर्जेपुरा मार्गावर निशान मिरवणूक सुरू असताना रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मिरवणुकीची परवानगी वेळ संपत असल्याने साध्या वेशातील पोलीस कॉन्स्टेबल अनुप झाडबुके व त्यांचे सहकारी वाहतूक सुरळीत करत होते. झाडबुके यांनी हिंदवी शौर्य वाद्य पथकातील सदस्यांना मिरवणूक पुढे नेण्यास सांगितले. याचा राग येऊन सुनील करांदे व त्याच्या तीन साथीदारांनी झाडबुके यांच्याशी वाद घालत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
तू कुठला पोलीस, तुझ्याकडे पाहतोच, अशी धमकी देत आरोपींनी झाडबुके यांना अंगावर धावून जात मारहाण व धक्काबुक्की केली. या घटनेत पोलीस अंमलदार अनुप झाडबुके किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


