शेवगाव शेअर बाजार फसवणूक : आरोपी साईनाथ कवडेला सुप्रीम कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

शेवगाव शेअर बाजार फसवणूक : आरोपी साईनाथ कवडेला सुप्रीम कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – शेवगाव तालुक्यात गाजलेल्या १ कोटी ६१ लाखांच्या शेअर बाजार गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील आरोपी साईनाथ कल्याण कवडे याचा नियमित जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आरोपीला मोठा धक्का बसला आहे.

शेवगाव येथील रहिवासी अवधूत विनायक केदार यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांची मिळून १ कोटी ६१ लाख ४२ हजार ९०० रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने ‘ऍसिटिक सोल्युशन्स’ या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर १२ टक्के परतावा देण्याचे आश्वासन देत विश्वास संपादन केला. अनेकांनी मोठी गुंतवणूक केली, मात्र परतावा व मूळ रक्कमही परत न केल्याने फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली. याप्रकरणी २८ ऑक्टोबर २०२४ रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय, अहिल्यानगर येथे आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही त्याला दिलासा मिळाला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत आरोपीने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल केली होती.

सदर याचिकेवर न्या. संजय कुमार व न्या. संजीव सचदेवा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. फिर्यादी अवधूत केदार व इतरांच्या वतीने ॲड. संदीप देशमुख व ॲड. प्रशांत गिरी यांनी जामीनास तीव्र विरोध केला.

खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले की, “या टप्प्यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यासाठी कोणतेही ठोस कारण आढळले नाही. त्यानुसार ही विशेष अनुमती याचिका फेटाळण्यात येत आहे.”

फिर्यादीच्या वतीने ॲड. संदीप देशमुख यांनी बाजू मांडली, त्यांना ॲड. प्रशांत गिरी, ॲड. योगेश कासोद व ॲड. पवन जोंधळे यांनी सहकार्य केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फिर्यादी व अन्य गुंतवणूकदारांमध्ये समाधान व्यक्त होत असून जिल्हा, उच्च आणि आता सर्वोच्च न्यायालयानेही जामीन नाकारल्याने या बहुचर्चित प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles