जमीन बळकावून अवाजवी व्याजाची मागणी; अवैध सावकारी करणारे दोघे जेरबंद
तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – तारण ठेवलेली जमीन परत न करता अवाजवी व्याजाची मागणी करून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
सुरेश मोतीलाल कांकरिया (वय ६४, रा. विराज कॉलनी, तारकपूर) आणि विनय गुरुलिंग होनराव (वय ५५, रा. होनराव वाडा, डावरे गल्ली, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी दत्तात्रय जगन्नाथ आगरकर (वय ७७, रा. आगरकर मळा, रेल्वे स्टेशन शेजारी) यांनी सन २०१६ पासून वेळोवेळी स्वतःची जमीन तारण ठेवून कांकरिया यांच्याकडून २ कोटी रुपये व्याजाने घेतले होते. फिर्यादीने आतापर्यंत ३ कोटी ७५ लाख रुपये मुद्दल व व्याजापोटी परत केले. तरीही आरोपींनी तारण जमीन परत न करता फसवणूक करत अवैधरीत्या व्याजावर व्याज लावून तब्बल १८ कोटी ३८ लाख १४ हजार ६९५ रुपयांची मागणी करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७७९/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०८(२)(३)(४)(५), ३१८(४), ३५१(२)(३), ३(५) सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम ३१, ३९, ४४, ४५, ४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशावरून पो.नि. संतोष मुटकुळे यांनी अंमलदार संदीप पवार, विजय ठोंबरे, सतीश भवर, महिला अंमलदार किरण ठुबे यांचे पथक नेमले होते. दि. ७ सप्टेंबर रोजी तारकपूर परिसरात शोध घेऊन दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पुढील तपासासाठी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.


