डिंभे-माणिकडोह बोगद्यावरून राजकारण तापले: वळसे पाटलांचा विरोध शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावणारा – खा. निलेश लंके

श्रीगोंदा : प्रतिनिधी डिंभे – माणिकडोह बोगदा हा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा प्रकल्प आहे. हा बोगदा झाल्यानंतर उन्हाळ्यात कुकडीला अधिकचे एक आवर्तन मिळू शकेल. आ. दिलीप वळसे पाटील यांनी या बोगद्याला केलेला विरोध हा अत्यंत चुकीचा असून, तो दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावणारा आहे. डिंभे ते माणिकडोह बोगदा होणे हाच शाश्वत उपाय असून, बोगदा होण्यासाठी आमची आरपार लढाई करण्याची तयारी असल्याची भूमिका अहिल्यानगर दक्षिणचे खासदार डॉ. नीलेश लंके यांनी व्यक्त केली.

डिंभे – माणिकडोह बोगद्यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, गेली अनेक वर्ष या बोगद्याचा विषय चर्चेत आहे. मी स्वतः यापूर्वीही मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्याशी या विषयावर अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. आजही पुन्हा मी या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

हा प्रश्न केवळ राजकारणाचा नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात मी देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून, त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

“जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याला याचा कोणताही तोटा होणार नाही. धरणात अतिरिक्त असलेले पाणी केवळ बोगद्याअभावी अडते. तरीही आ. वळसे पाटील विरोध करत असतील तर ते दुर्दैवी आहे. त्यांनी मोठ्या मनाने दुष्काळी श्रीगोंदा, पारनेर, कर्जतच्या शेतकऱ्यांचा विचार करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
हा विषय केवळ एका बोगद्याचा नाही, तर श्रीगोंदा, पारनेर, कर्जतच्या लाखो शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा आहे. पिण्याच्या पाण्यापासून ते जनावरांच्या चाऱ्यापर्यंत प्रश्न गंभीर आहे. जर शासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर येत्या अधिवेशनात मंत्रालयावर कुकडी लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही खा. लंके यांनी दिला. हा बोगदा झाला तर शेतकऱ्याच्या बांधावर पाणी येईल, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा बोगदा झालाच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे.

हा बोगदा झाला तर कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. उन्हाळ्यात पाण्याअभावी जळणारी पिके वाचतील. त्यामुळे हा बोगदा झालाच पाहिजे, यासाठी आम्ही संसदेपासून मंत्रालयापर्यंत लढा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles