सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिचे रूपांतर प्रेमसंबंधात करणार्या युवकाने आई-वडिल आजारी असल्याचे सांगत तिच्याकडून 192 ग्रॅम सोन्याचे दागिने घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. सोने बँकेत गहाण ठेवून त्यावर पैसे घेऊन दागिने परत करण्याचे आमिष दाखवून युवकाने हे सोने लुबाडले. त्यानंतर त्याने सोने नेवासा येथील तीन सोनारांकडे विकले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून तीन सोनारांकडून 184 ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत केले.
नेवासा येथील तेजस मारूती परदेशी (वय 23) याची सोशल मीडियाच्या माध्यमातून अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहणार्या अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. सुरूवातीला मैत्री आणि त्यानंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. परदेशी याने मुलीची भेट घेऊन तिचा विश्वास संपादन केला. दरम्यान, आपले आई-वडील आजारी असून त्यांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असल्याचे त्याने मुलीला सांगितले. तसेच, तिच्या घरातील सोन्याचे दागिने आपल्याकडे दिल्यास ते बँकेत गहाण ठेवून त्यावर पैसे काढता येतील आणि पुढे कर्ज फेडून दागिने परत देऊ, असा विश्वास त्याने मुलीला दिला. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुलीने घरातील सुमारे 192 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याच्याकडे दिले.
दागिने मिळाल्यानंतर परदेशी याने सुरूवातीला ते एका पतसंस्थेत तारण ठेवून पैसे घेतले. तारण ठेवलेल्या सोन्याच्या पावत्यांचे फोटो त्याने आपल्या मोबाईलमध्ये काढले. या पावत्यांचे फोटो त्याने मुलीलाही दाखवून आपण सोने तारण ठेवल्याचा विश्वास कायम ठेवला. मात्र, त्यानंतर त्याने पतसंस्थेतून सोने सोडवून घेतले आणि ते विक्री करण्याचा निर्णय घेतला. नेवासा येथील तीन सोनारांकडे सोने विक्रीसाठी गेल्यानंतर सोनारांनी त्याच्याकडे सोन्याच्या पावत्या मागितल्या. त्यावेळी परदेशी याने पतसंस्थेत सोने तारण ठेवल्याच्या पावत्या दाखवल्या. त्यानंतर त्याने संबंधित तीन सोनारांना सोने विक्री करून त्यातून पैसे घेतले.
दरम्यान, मुलीच्या वडिलांनी 11 सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार परदेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तपास सुरू करून परदेशी याला तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सोने विकलेल्या सोनारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित तीन सोनारांकडून सुमारे 184 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले. परदेशी याला नोटीस देण्यात आली असून, सोने खरेदी करणार्या तीन सोनारांना या गुन्ह्यात साक्षीदार करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक निरीक्षक थोरात यांनी दिली.


