अहिल्यानगर -गणेशोत्सवासाठी गणपतीची मूर्ती आणण्यासाठी पती-पत्नी घराबाहेर गेले असता त्यांच्या बंद घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून सुमारे सहा तोळ्याचे सोन्याचे व पाच भाराचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना तपोवन रोडवरील ढवणवस्ती येथे रविवारी (13 सप्टेंबर) घडली. गणपतीची मूर्ती घेऊन घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा आणि कोंडा तुटलेला दिसल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी ऋषिकेश सुभाष ढवण (वय 25) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी तीन वाजता ऋषिकेश ढवण व त्यांची पत्नी राणी हे दोघे गणपतीची मूर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. गणपतीची मूर्ती घेऊन ते सायंकाळी 6.15 वाजता घरी पोहोचल्यानंतर पत्नी राणी यांना घराच्या दरवाजाला कुलूप नसल्याचे तसेच दरवाजाचा कोंडा तुटलेला असल्याचे दिसले. त्यांनी ही बाब पती ऋषिकेश यांना सांगितल्यानंतर त्यांनीही घराची पाहणी केली असता चोरी झाल्याचा संशय आला. दोघांनी घरात प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
यानंतर त्यांनी पोलिसांना चोरीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी फिंगरप्रिंट विभागाच्या पथकाला पाचारण केले. पथकाने घराची तपासणी केल्यानंतर फिर्यादीने पुन्हा घरातील साहित्याची पाहणी केली. त्यावेळी कपाटातील लॉकर तुटलेले दिसून आले. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या ऐवजात 30 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 15 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या पळ्या व मणी, 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुबे, पाच भाराचे चांदीचे करंडे, पैंजण व पायातील जोडवे असा ऐवज चोरीला गेला आहे.


