महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत प्रशासन व युनियन बैठक संपन्न
कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन धरणे आंदोलन स्थगित
अहिल्यानगर : महानगरपालिका कामगार युनियनने प्रशासक तथा आयुक्त यांना कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत दि. १४/०५/२०२५ रोजी बेमुदत धरणे आंदोलनाची नोटीस दिली होती. प्रशासनाने दि. २१/०५/२०२५ रोजी युनियनला लेखी पत्र पाठवुन धरणे आंदोलन करू नये अशी विनंती केली होती. परंतु या पत्रामध्ये कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कोणताही ठोस निर्णय प्रशासनाने दिलेला नसल्यामुळे युनियन दि. २८/०५/२०२५ रोजीच्या बेमुदत धरणे आंदोलनावर ठाम होती. महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. विजयकुमार मुंडे यांनी दि. २७/०५/२०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता मनपा अधिकारी व युनियन पदाधिकारी यांची कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये कामगारांच्या प्रश्नांवर साधकबाधक चर्चा झालेनंतर युनियनच्या वतीने युनियनचे अध्यक्ष श्री. जितेंद्र सारसर व सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांनी दि. २८/०५/२०२५ रोजीचे बेमुदत धरणे आंदोलन स्थगित केल्याचे सांगितले. यानंतर बैठकीमध्ये पुढीलप्रमाणे कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात आले. १) मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५०६ कोर्ट कर्मचारी यांना पाचव्या वेतन आयोगाचा फरक देणेबाबत पुर्वी ठरल्याप्रमाणे फरकाच्या रक्कमांचे समान २४ हप्ते करून ते दरमहा वेतनासोबत अदा करण्याचे ठरले होते, त्याप्रमाणे दिवाळीपूर्वी एक हप्ता वेतनासोबत अदा करण्यात आला. त्यानंतर अद्यापपर्यंत फरकाचे हप्ते अदा करण्यात आलेले नव्हते. याविषयावर सविस्तर चर्चा करून उर्वरीत फरकाचे हप्ते दरमहा वेतनासोबत अदा करण्याचे लेखाधिकारी यांना मा. उपायुक्त यांनी सुचना केली. एखाद्या महिन्यात अडचण आल्यास युनियनसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे सदर संयुक्त बैठकीत ठरले आहे. २) हद्दवाढीतील कामगारांचे मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे कामगारांना ५ व्या वेतनाच्या आयोगाच्या फरकाची रक्कम अदा करणेबाबतचा निर्णय झालेला असुन अद्यापपर्यंत त्यांचे फरकाचे तक्ते तयार केलेले नव्हते. याबाबत मा. उपायुक्त यांनी सहाय्यक आयुक्त तथा आस्थापना प्रमुख यांना संबंधित कर्मचाऱ्यांचे फरकाचे तक्ते करण्याचे कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले. तक्ते तयार झाल्यानंतर युनियनबरोबर चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले आहे. ३) कामगारांचे ६ व्या वेतन आयोगाचे फरकाचे हप्त्यांपैकी २ हप्ते अद्यापपर्यंत कामगारांना अदा केलेले नव्हते त्यापैकी एक हप्ता कामगारांना सप्टेंबर २०२५ मध्ये तर उर्वरीत एक हप्ता दिवाळीनंतर अदा करण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले. ४) सेवानिवृत्त कामगारांचे ६ व्या वेतन आयोगाचे उर्वरीत हप्ते त्वरित अदा करणेबाबत निर्णय घेण्यात आला. त्यापैकी ३ हप्ते या वेतनामध्ये अदा करण्यात आले आहेत व उर्वरीत हप्ते लवकरात लवकर अदा करण्याचे उभयपक्षी ठरले आहे. ५) कालबद्ध पदोन्नती योजनेच्या फरकाच्या रक्कमा गेल्या ८/१० वर्षांपासुन प्रलंबित होत्या. यापैकी कालबद्ध पदोन्नतीचे आदेशाप्रमाणे सेवाजेष्ठतेने कामगार-कर्मचाऱ्यांच्या फरकाच्या रक्कम अदा करण्याबाबत सुचना करण्यात आल्या व व त्या चालु महिन्यापासुन दरमहा अदा करण्याचे उभयपक्षी ठरविण्यात आले. ६) वैद्यकीय प्रतिपुर्तीची सर्व बिले तात्काळ कामगारांना अदा करण्यात यावीत. तसेच यापुढे कामगारांचे येणारी वैद्यकीय प्रतिपुर्तीची बिले दरमहा पगाराबरोबर अदा करण्यात यावीत. याबाबत उभयपक्षी चर्चा करून सेवाजेष्ठतेप्रमाणे दरमहा शक्य तेवढे जास्तीत जास्त बिले अदा करण्याचे ठरले. तसेच मार्च २०२६ पुर्वी वैद्यकीय प्रतिपुर्तीची सर्व बिले अदा करण्याबाबत मा. उपायुक्त यांनी लेखाधिकारी यांना सुचना केल्या. ७) निवृत्ती वेतन अंशदान योजनेतील सुमारे २५० लाभार्थी यांचे प्रलंबित असलेल्या रक्कमा त्यांचे खाते उघडून त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात याव्यात. याबाबत या योजनेतील सर्व लाभार्थ्यांच्या वेतनातुन कपात केलेल्या महानगरपालिकेचा हिस्सा या सर्व रक्कमा येत्या ६ महिन्यांचे आतमध्ये त्यांचे खात्यावर वर्ग करण्यात येतील. तसेच ज्या कामगार- कर्मचाऱ्यांचे अर्ज अद्याप भूरुन दिलेले नाहीत, त्यांना ताबडतोब अर्ज भरून आस्थापना विभागामार्फत सादर करणेबाबत युनियनने सहकार्य करण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले. तसेच यापुढे नवीन नियुक्ती देत असतांना आस्थापना विभागाने याबाबतची सर्व पुर्तता करून घेऊनच नियुक्ती पत्र देणेबाबत सुचना करण्यात आल्या. ८) एल.जी.एस. एल.एस.जी.डी. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना जादा वेतनवाढी मिळणेबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे अंतिम निर्णयासाठी तत्काळ पाठविण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासक तथा आयुक्त रजेवर असलेमुळे ते रुजु झालेनंतर तात्काळ हा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले. ९) पात्र कामगार-कर्मचाऱ्यांना बढती व कालबद्ध पदोन्नती देणेकामी निवड समिती गठित करून या समितीमार्फत बढतीचे फायदे देण्याबाबत कार्यवाही चालु आहे. जुन २०२५ च्या शेवटच्या आठवडयात किंवा जुलै २०२५ च्या पहिल्या आठवडयामध्ये निवड समितीची बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्याचे ठरले. १०) महानगरपालिकेने महासभेमध्ये केलेल्या ठरावानुसार आरोग्य विभागातील आर.सी.एच. व एन.यु.एच.एम. मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीकरीता तत्काळ पाठविण्याबाबतचा लेखी अहवाल प्रभारी वैद्यकीय आरोग्याधिकारी यांनी नुकताच आस्थापना विभागाकडे पाठविलेला आहे. त्याची पडताळणी करून प्रशासक तथा आयुक्त रजेवरून आलेनंतर लवकरात लवकर हा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येईल असे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी आश्वासन दिले. ११) महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना घरकुल योजना राबविण्याबाबत सदर संयुक्त बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होऊन महापालिकेच्या अखत्यारीतील रिकाम्या भुखंडाबाबत नगररचना विभागास पत्र पाठवुन त्यांचेकडून माहिती घेऊन प्रकल्प विभाग, बांधकाम विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी सदर माहिती संकलित करून महानगरपालिकेस लवकरात लवकर सादर करावी. तसेच त्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमार्फत घरे उपलब्ध करून दिलेली नाहीत अशा सर्व कामगार-कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमार्फत घरे बांधुन देणेबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तसेच बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांकरीता स्वतंत्र निवासाची व्यवस्था या प्रकल्पामध्ये करण्यात यावी असे ठरविण्यात आले. रिकाम्या भुखंडाबाबतचा अहवाल प्राप्त झालेनंतर याबाबत चर्चा करून पुढील निर्णय घेणेबाबत ठरले आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपायुक्त (सामान्य) विजयकुमार मुंडे, लेखाधिकारी सचिन धस, सहाय्यक आयुक्त तथा आस्थापना प्रमुख मेहेर लहारे, प्रकल्प अभियंता राजेंद्र मेहेत्रे, मनपा लेखा विभागातील कर्मचारी अनिल लोंढे, तसेच युनियनच्या वतीने अध्यक्ष जितेंद्र सारसर व बाबासाहेब मुदगल, आनंदराव वायकर, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, राहुल साबळे, नंदुकुमार नेमाणे, विठ्ठल उमाप, अनंत लोखंडे इत्यादींनी संयुक्त बैठकीमध्ये सहभाग घेतला होता.


