समता नागरी सहकारी पतसंस्थेतील संशयित खातेदार प्रतिभा चाकणकर यांनी सोमवारी शिर्डी पोलिसांसमोर हजर होत एक मोठा गौप्यस्फोट केला. समता पतसंस्थेत माझ्या नावाने असलेले खाते पूर्णपणे बनावट असून, त्यावरील स्वाक्षर्या माझ्या नाहीत, असा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समता पतसंस्थेत अशोक खरात याने उघडलेल्या कथित 100 बोगस खात्यांच्या तपासाचे लोण आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांनी स्पष्ट केले, त्यांच्या नावाचा गैरवापर करून हे खाते उघडण्यात आले असून, या खात्यातून त्यांनी आजवर एक रुपयाचाही व्यवहार केलेला नाही. पोलिसांकडून कोणतीही अधिकृत नोटीस मिळाली नसली, तरी तपासाला सहकार्य करण्यासाठी आपण स्वतःहून पोलिसांकडे धाव घेतली.
यावेळी प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांनी त्यांचे अधिकृत स्वाक्षरी नमुने पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. माझ्या नावाचा वापर करून कोणीतरी ही फसवणूक केली आहे, हे अत्यंत धक्कादायक आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या वकील अॅड. जयश्री काळे-पालवे यांनी सांगितले की, अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही, मात्र कायद्याच्या चौकटीत राहून तपासाला पूर्ण सहकार्य केले जाईल. आता पोलिसांकडून या स्वाक्षरी नमुन्यांची आणि पतसंस्थेतील कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.


