अहिल्यानगर -येथील सराफ व्यापार्याने व्याजाने घेतलेल्या पैशाच्या वसुलीच्या नावाखाली एका महिलेसह तिच्या कुटुंबियांनी व्यापार्याच्या घरात घुसून प्रचंड दहशत निर्माण केली. लहानग्या मुलाच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच पत्नीच्या कपड्याची विटंबना करून बेअब्रू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सावकारी पध्दतीने सुरू झालेला हा आर्थिक व्यवहार आता गुन्हेगारी वळणावर जाऊन थेट जीव घेण्याच्या धमक्यांपर्यंत पोहोचल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी 10 ते 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वस्तिक चौक येथे राहणार्या सराफ व्यापार्याने (वय 31) फिर्याद दिली आहे. कविता रमाकांत पराळे, सोहन सुरेश सातपुते, रमाकांत पराळे, तीन मुले व इतर चार ते पाच अनोळखीविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा अहिल्यानगर शहरात सराफ बाजारात सोने-चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय आहे. 2020 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी दुकान सांभाळायला सुरूवात केली. दुकानाच्या वाढीव भांडवलासाठी त्यांनी ओळखीतून कविता पराळे हिच्याकडून जून 2024 मध्ये 15 टक्के व्याज दराने 26 लाख रूपये उचलले.
व्यवहारासाठी नोटरी दस्तऐवजही करण्यात आला. सुरूवातीला दर महिन्याला रोख रकमेने 20 हजार रूपये व्याज देणे सुरू होते. फिर्यादीने 2024 ते 2025 या काळात एकूण 49 लाख 1 हजार 500 रूपये व्याजाच्या स्वरूपात रोख, ऑनलाईन व आरटीजीएसव्दारे दिले. तरीही कविता पराळे आणि तिच्या कुटुंबाकडून पैशांची मागणी सुरूच राहिली.
त्यांनी केवळ पैसेच नाही तर फिर्यादीची कार (एमएच 16 बीझेड 3660) बळजबरीने घेऊन गेल्याचा आरोपही फिर्यादीत केला आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. कविता पराळे रूग्णालयात उपचार घेत असून तिच्यावर पोलिसांचा वॉच असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.
सराफ बाजारातील प्रतिष्ठित व्यापार्याच्या घरी घुसून पोराच्या डोक्यावर पिस्तूल, पत्नीच्या अब्रूचा खेळ व मालमत्तेचा बळकाव यामुळे संपूर्ण व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या सराफ व्यापार्यांच्या बाबतीत सावकारकीचे हे नवे गुन्हेगारी रूप अत्यंत भयावह असल्याची भावना व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.
मुलाच्या डोक्यावर पिस्तुल
7 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कविता पराळे, तिचा पती रमाकांत पराळे, तीन मुले व बाऊन्सरसदृश चार ते पाच अनोळखी इसम फिर्यादीच्या घरी जबरदस्तीने घुसले. रमाकांत पराळे याने फिर्यादीच्या 5 वर्षीय मुलाला उचलून त्याच्या डोक्यावर पिस्तुल ठेवत 15 लाख रूपये दे नाहीतर ठार मारतो अशी थेट धमकी दिली. फिर्यादी दाम्पत्याने त्यांच्या पायावर पडून मुलाचे प्राण वाचवले. फिर्यादीच्या पत्नीचाही अपमान करण्यात आला. संशयित मुलीने त्यांचे केस पकडून फरफटत घराबाहेर ओढले, तर रमाकांत पराळेने अश्लिल शब्दात शिवीगाळ केली. या संपूर्ण प्रकारामुळे फिर्यादी कुटुंब भयभीत झाले असून पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.


