पाथर्डी -समाजमाध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित झाल्याप्रकरणी पाथड पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक केली. सूरज बाबासाहेब वांढेकर (वय 36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तांत्रिक तपासाच्या आधारे त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या समाजमाध्यम खात्याचा गैरवापर करून संबंधित पोस्ट प्रसारित केल्याचे निष्पन्न झाले आहे.
बुधवारी (दि. 8) संबंधित आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच पाथर्डी शहरासह तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली. विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
या घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी घोषणाबाजी करत पाथर्डी पोलीस ठाण्यावर धडक दिली आणि दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. निवेदनाद्वारे वेळेत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. त्यावेळी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सखोल तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. घटना घडल्यानंतर आंदोलकांना दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने तपास पूर्ण करून आरोपीला अटक करण्यात आल्याने पाथर्डी पोलीस, सायबर सेलच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.


