अहिल्यानगर -शहरातील तारकपूर बस स्थानक परिसरात एका वीस वर्षीय तरुणीचा दुचाकीवरून पाठलाग करत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी ही सावेडी भागातील रहिवासी असून ती शिक्षण घेत आहे. ही घटना रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. पीडिता तिच्या वाहनावरून जात असताना, सिद्धार्थनगर भागातील रहिवासी असलेल्या बंटी उर्फ संकेत ससाणे या आरोपीने स्वतःच्या दुचाकीवरून तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.संशयित आरोपीने त्याचे वाहन पीडितेच्या वाहनाच्या समांतर आणले. त्यानंतर पीडितेच्या दिशेने अश्लील शब्द वापरून आणि आक्षेपार्ह हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकारानंतर आरोपी आपली दुचाकी वेगाने चालवून घटनास्थळावरून पसार झाला. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे घाबरलेल्या तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दिली.
या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी संशयित आरोपी बंटी उर्फ संकेत ससाणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तातडीने दखल घेतली असून पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार तनवीर शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


