अहिल्यानगर जिल्ह्यात चार सराईत टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई ; नगर व पाथर्डीतील गुन्हेगारांचा समावेश

अहिल्यानगर – जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी एकाच आठवड्यात चार गुन्हेगार टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. नगर शहरातील तीन आणि पाथर्डी तालुक्यातील एका अशा एकूण चार टोळ्यांतील 10 जणांना विविध कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले असून, यामध्ये शरीराविरूध्दचे, मालमत्तेविरूध्दचे तसेच गोवंशीय प्राण्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प, तोफखाना आणि पाथर्डी पोलीस ठाण्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर सखोल चौकशी करून संबंधित गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश देण्यात आले आहेत. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घातक शस्त्रांसह बेकायदेशीर जमाव करून खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत केल्याप्रकरणी सलमान उर्फ साहील रफिक शेख, अभिषेक गोरख धाडगे (दोघे रा. कापुरवाडी) आणि हर्षवर्धन अरूण तपकिरे (रा. बुर्‍हानगर) या तिघांना सहा महिन्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीविरूध्द पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आयान रईस शेख (रा. कोठी रोड) आणि अकबर लुकमान खान (रा. दौलावडगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांना 12 महिन्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या दोघांविरूध्द एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घातक शस्त्रांसह बेकायदेशीर जमाव करून गंभीर दुखापत केल्याच्या प्रकरणात वैभव संपत बारस्कर (रा. सावेडी) आणि अजय शिवाजी कर्पे (रा. भिस्तबाग) यांना तीन महिन्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीविरूध्द चार गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोमांस विक्री व गोवंशीय जनावरांशी क्रूरतेने वागल्याच्या प्रकरणात रेहाण सलीम कुरेशी, जव्वाद सलीम शेख आणि अमजद नुरमहोमद शेख (तिघे रा. तिसगाव) या तिघांना सहा महिन्यांसाठी नगर, नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव या चार तालुक्यांतून हद्दपार करण्यात आले आहे. संबंधितांविरूध्द गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करणे तसेच जनावरांना चारा-पाण्याविना अमानुष पध्दतीने बांधून ठेवल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles