क्षेत्रीय पातळीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचवणारे कृषि सहाय्यक आता थेट ग्रामपंचायत कार्यालयात बसून शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषि सहाय्यकांना ग्रामस्तरावर कार्यालयीन कामकाजासाठी स्वतंत्र जागा व फर्निचर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने 2019 मध्ये घेतला होता. मात्र, त्यावर आता गांभिर्याने अंमलबजावणी होणार आहे.
गाव पातळीवर ग्रामपंचायत इमारत अथवा आवारात कृषी साहयक, उपकृषी अधिकारी व मंडल अधिकारी यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील 14 गटविकास अधिकार्यांना काढले आहे. यामुळे लवकर जिल्ह्यातील 49 मंडल कृषी अधिकारी, 98 उपकृषि अधिकारी व 588 कृषी साहयक यांना बसण्यासाठी त्यात्या गावातील ग्रामपंचायतींच्या कार्यालयात जागा उपलब्ध होणार आहे.
राज्यात सध्या सुमारे 11 हजार 599 कृषि सहाय्यक कार्यरत आहेत. नैसर्गिक आपत्तीचे सर्वेक्षण करणे, नवीन तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचवणे, कीड-रोग नियंत्रण आणि खतांच्या नियोजनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करणे अशा अनेक जबाबदार्या त्यांच्यावर असतात.
शेतकर्यांना त्यांच्या कामासाठी कृषि सहाय्यकांची भेट घेणे सोपे व्हावे, यासाठी शासनाने या कृषी साहयक यांच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कार्यालयीन कामकाजासह त्यांचे दप्तर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी कृषि सहाय्यकांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कार्यालयीन दस्तऐवज व कामकाजासाठी 150 ते 200 चौरस फूट जागा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. जागा उपलब्ध झाल्यानंतर तेथे टेबल, खुर्ची आणि कपाटासारख्या आवश्यक फर्निचरची व्यवस्था करण्याची जबाबदारी पुणे कृषि आयुक्तालयाचे आयुक्त यांच्यावर सोपवण्यात आली आहे.नगर जिल्ह्यात काही मोठ्या ग्रामपंचायतींनी दूरदृष्टी ठेवत यापूर्वीच त्यांच्या इमारती अथवा आवारात कृषी विभागाला जागा देवून त्या ठिकाणी त्यांचे कार्यालय सुरू करण्यास मदत केलेली आहे. मात्र, अनेक ठिकाणी ते शक्य झालेले नाही. यामुळे आजही जिल्ह्यातील 588 ठिकाणी कृषी विभागाला गाव अथवा ग्रामपंचायत पातळीवर कार्यालय सुरू करता आलेले नाही.कृषि सहाय्यकाचे कार्यालय निश्चित झाल्यावर त्या ठिकाणी तसा फलक लावण्यात येईल. या फलकावर कृषि सहाय्यकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, कामाचे दिवस आणि वेळ स्पष्टपणे नमूद करावी लागणार आहे.


